Pages

Saturday, 6 October 2018

नादिया मुराद आणि मुकवेगे यांना शांततेचे नोबेल

युद्धातील लैंगिक हिंसाचाराविरोधात केलेल्या कामाबद्दल नादिया मुराद आणि कांगोचे डॉ. डेनिस मुकवेगे यांना २0१८ सालचा मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वत: बलात्काराची शिकार ठरलेल्या नादिया आणि स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या मुकवेगे यांनी लैंगिक अत्याचाराविरोधातील लढाई लढतानाच जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उल्लेखनीय काम केल्यानेच त्यांचा गौरव करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यंदा नोबेल शांतता पुरस्कारासाठी ३३१ जणांची नावे आली होती. (त्यात २१६ लोकांची आणि ११५ संघटनांची नावे होती) त्यातून नादिया मुराद आणि डेनिस मुकवेगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर २0१६ मध्ये निवड समितीकडे ३७६ लोकांची नावे आली होती. आतापर्यंत ९८ जणांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. त्यात १0४ लोकांचा आणि २७ संघटनांचा समावेश आहे. या १0४ विजेत्यांमध्ये १६ स्त्रियांचा समावेश आहे. दरम्यान, कॅन्सरवर काम करणारे जेम्स पी. एलिसन आणि तासुकू होंजो यांना चार दिवसांपूर्वीच संयुक्तपणे आरोग्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आले आहेत. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी या दोघांनी एक नवीन थेरपी शोधून काढली आहे. डेनिस मुकवेगे हे मुळचे कांगोचे. त्यांनी गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने युद्धातील लैंगिक हिंसाचाराविरोधात आवाज उठवला आहे. मुकवेगे हे स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्यांनी लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रीयांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.नादिया मुराद या इराकच्या असून त्या यजीदी या अल्पसंख्याक समाजातील आहेत. आयएस या दहशतवादी संघटनेने नादिया यांचे अपहरण केले होते. त्यांच्यावर या अतिरेक्यांनी अनेकदा बलात्कार करून त्यांचे शोषण केले होते. त्यांना आयएसची सेक्स स्लेव्हही म्हटले जाते. या अतिरेक्यांच्या तावडीतून पळाल्यानंतर नादिया यांनी जगभरातील महिलांच्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडत जनजागृती करण्याचे काम केले.

   

No comments:

Post a Comment