भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होमी भाभा यांना भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेते मानले जाते. भाभा यांचा जन्म मुंबईत ३0 ऑक्टोबर १00९ रोजी सधन पारशी कुटुंबात झाला. वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तिमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम व्यक्ती होते. त्यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनिअर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते.
पण त्यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिकशास्त्रेच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रिज विद्यापीठातून १९३0 साली प्रथम श्रेणीत इंजिनिअर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास करून इ.स. १९३३ साली त्यांनी डॉक्टरेट मिळवली. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षिसेही मिळाली. १९४0 साली भारतात परत आल्यावर काही काळ त्यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक पर्शिमांमुळेच भारत देशात अणुभट्टीची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणुभट्टी सुरू करून त्यांचा वीज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला. संयुक्त राष्ट्रच्या सभेला जाताना २४ जानेवारी १९६६ या दिवशी फ्रान्सच्या हद्दीत असताना त्यांचे विमान अपघातात निधन झाले.
No comments:
Post a Comment