Monday, 27 December 2021

गेब्रियल बोरीक: चिलीचा सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष


अलीकडच्या काळात जगातल्या काही देशात तरुणांचं आणि त्यातही महिलांचं नेतृत्व पुढे आलं आहे आणि त्यांनी सत्ता मिळवली आहे. २०१९ मध्ये फिनलंड येथे साना मारिन वयाच्या ३४ व्या वर्षी पंतप्रधान झाल्या. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिन्डा आर्डन २०१७ मध्ये ३७ वर्षाच्या असताना पंतप्रधान झाल्या. मॅक्रॉन फ्रान्सचे अध्यक्ष झाले तेव्हा ते ३९ वर्षांचे होते. तर  आता गेब्रियल बोरीक नावाच्या ३५ वर्षाच्या डाव्या विचाराच्या तरुणाला चिलीच्या मतदारांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिलं आहे. बोरीक यांच्या विजयामुळे चिली येथे जल्लोष साजरा करण्यात येत आहे. जोस एन्टोनियो कास्ट नावाच्या उजव्या विचाराच्या उमेदवाराचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बोरीकने प्रचंड मताने पराभव केला. अलीकडे समाजवादी विचारांचा पेरू, बोलिव्हिया, होन्डुरास आणि व्हेनेझुएलाच्या निवडणुकीत विजय झाला आहे. ११ मार्चला बोरिक राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील.विद्यार्थी आंदोलनाचं महत्त्व लॅटिन अमेरिकेतील चिली या देशाने सिद्ध केलं आहे. चिलीचे माजी हुकुमशहा ऑगस्तो पिनोशेचेदेखील कास्ट समर्थक. जनरल पिनोशे यांनी १९७३ मध्ये बंड करून मार्क्सवादी साल्वाडोर आलंदेला उलथवून सत्ता हस्तगत केलेली. पिनोशेची सत्ता १९९० पर्यंत होती. त्या काळात तीन हजाराहून अधिक विरोधकांची हत्या करण्यात आलेली. कास्ट मुक्त अर्थव्यवस्थेच्या बाजूचे. गेल्या एक-दीड वर्षात कास्टच्या लोकप्रियतेत वाढ झालेली. दुसरीकडे बोरीक रस्त्यावर उतरून चिलीच्या सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडत असे. त्यांचा प्रचाराचा मुख्य मुद्दा चिलीचे रूपांतर लोककल्याणकारी देशात करायच होतं. त्यांचे विरोधी त्याची तो साम्यवादी असल्याची टीका करत असे. श्रीमंतांवर अधिक कर लावून सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी त्याचा उपयोग करण्यात येईल असा प्रचार बोरीक करत असे.

सान्तियागो ही देशाची राजधानी. बोरीक इथला विद्यार्थी नेता होता. देशाच्या खासगी शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात हजारो विद्यार्थ्यांचे त्यांनी मोर्चे काढले होते. चांगलं शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे,असं मोर्चा व जाहीर सभेतून ते लोकांना सांगत असे. चिलीत श्रीमंत आणि गरीबांमध्ये खूप दरी आहे. २०१९ च्या ऑक्टोबरमध्ये चांगली शिक्षण व्यवस्था व चांगली पेन्शन योजनासाठी आणि श्रीमंतांना फायदे करून देणारी आर्थिक व्यवस्था संपवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. त्याची नोंद घेऊन राष्ट्राध्यक्ष सेबास्टियन पिनेटा यांनी नवीन राज्यघटना तयार करण्याची जाहिरात केली. आता नवीन घटनेचे काम सुरू आहे. पुढच्या वर्षी नवीन राज्यघटनेवर जनमत घेण्यात येणार. राज्यघटनेसाठी बनवण्यात आलेल्या समितीत निम्म्या संख्येत महिला आहेत. २१ वर्षाचा एक तरुणही समितीत आहे. आताची राज्यघटना जनरल पिनोशेच्या काळातली आहे. पिनोशेच्या राजवटीत लोकांवर प्रचंड अत्याचार करण्यात आलेले. मानवाधिकारांचे खुलेआम उल्लंघन करण्यात येत होतं.तरुण, कामगार आणि महिलांनी मोठ्या संख्येत मतदान केलं आणि त्याचा फायदा बोरीकला झाला.  कामगारांच्या प्रश्नांवर ते सतत बोलत असल्याने कामगार त्यांच्या बाजूने उभे राहिले.बोरीक हे चिलीचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष असतील.

 त्यांनी म्हटलं आहे की, ‘आमचं धोरण सर्वसमावेशक असणार. विद्यार्थ्यांवरील कर्ज माफ करण्यात येईल आणि चांगली पेन्शन योजना बनवण्यात येईल.’

 राष्ट्राध्यक्ष पिनेटा यांनी त्यांचे अभिनंदन केले. कास्ट यांनी पण बोरीक यांच अभिनंदन केलं. बोरीक यांच्या आघाडीत साम्यवादी पक्षाचाही समावेश आहे. क्युबा, कोलंबिया, पेरू, बोलिवीया, ऊरूग्वे, कोस्टारिकाने लगेच त्याचं कौतुक करून अभिनंदन केलं.२०११ च्या विद्यार्थी आंदोलनात बोरीक सहभागी झालेले आणि हळूहळू नेतृत्व त्यांच्याकडे आलं. विद्यार्थी आंदोलनानंतर ते दोनदा संसदेत निवडून आले. त्यानंतर राष्ट्राध्यक्षपदासाठी उभा राहण्याचा निर्णय त्याने घेतला.असणार. कामगारांच्या अपेक्षा पूर्ण करणं बोरीकसाठी सोपे नसणार; पण रस्त्यावर उतरून संघर्ष करत त्याने सत्ता मिळवली आहे. या संपूर्ण काळात त्याच्यासोबत प्रामुख्याने विद्यार्थी होते. बोरीक डाव्या विचारांचा असल्याने कामगार आणि महिलांची त्यांच्यकडून खूप अपेक्षा आहेत. हवामान बदलाचा पण त्यांनी गंभीरतेने विचार केला असून काही नवीन खाण प्रकल्प रद्द करण्याचा विचार त्याने व्यक्त केला आहे. चिली येथे तांब्याचा प्रचंड साठा आहे आणि अनेक देशाला तांब्याचा पुरवठा चिली करत आहे. चिली देशात श्रीमंत आणि गरीबांमध्ये प्रचंड दरी आहे. एक टक्के लोकांकडे चिलीची २५ टक्के संपत्ती आहे. चिली येथे कामगार, कर्मचारी आठवड्याला ४५ तास काम करतात. आता कामाचे तास ४० करण्यात येतील, असं बोरीसने म्हटलं आहे. 

No comments:

Post a Comment