गजीनृत्य प्रामुख्याने धनगर समाजात पिढ्यानपिढ्या चालत आलेली लोककला आहे. धनगर समाजाची बिरोबा, धुळोबा, सतोबा, नागोबा,भिवाडी, आयाक्का, बाळूमामा, सिदोबा आदी दैवते आहेत.त्यांची भक्ती आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी लोकनृत्याद्वारे लोकजागर केला जातो. गजी नृत्यामध्ये गजी वर्तुळाकार नाच करतात. गजनृत्यामध्ये नृत्य करणाऱ्यास गजी म्हणतात, तर ढोल वाजवणाऱ्यास ढोल्या म्हणतात. ढोलाच्या तालावरच ताल धरला जातो. गजाची घाई लावणाऱ्यास म्होऱ्या म्हणतात. या खेळात म्होऱ्याची भूमिका महत्वाची असते. रंगीत रुमाल उडवत डाव्या - उजव्या बाजूला वळत तालबध्द नृत्य करतात. नृत्यात पंचवीस ते तीस लोकांचा सहभाग असतो. त्यांचा पोषाख अंगात तीन बटनी नेहरु शर्ट, डोक्यावर तुरा काढलेला फेटा, दोन्ही हातांत रुमाल, कमरेलाही रंगीत रुमाल व विजार किंवा धोतर घातलेली असा असतो. ढोलवादक ज्याप्रमाणे ढोलावर टिपरी मारतो त्याप्रमाणे नृत्याचा प्रकार चाल बदलतो. ढोलवादकाचा हावभाव, त्याच्या पायांची हालचाल महत्त्वपूर्ण असते. तो आवाजामध्ये चढउतार करतो, त्याक्षणी नृत्याला गती आणि हळुवारपणा येत असतो. सनई, सूर, तुतारी नृत्यास ताल निर्माण करतात. गजनृत्याच्या पंचावन्न प्रकारांपैकी उपलब्ध असलेल्या नऊ - दहा प्रकारांना घाय असे म्हणतात. कापसी घाय, थोरली घाय, गळा मिठी घाय, रिंगन घाय, घोड घाय, टिपरी घाय, दुपारतीची घाय, इत्यादी.
देवदेवतांच्या यात्रांमध्ये रात्रभर या गजीनृत्याचा देवाची पालखी व रात्रभर तेलाची वात आरतीमध्ये जाळून जागर केला जातो. तसेच भंडारा,वालुग, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, विविध मान्यवरांचे स्वागत समारंभ, वाढदिवस, सत्कार समारंभ व आयोजलेल्या विविध महोत्सवामध्ये गजीनृत्याचे सादरीकरण केले जाते.अलिकडे गजी मंडळांचा ड्रेसकोड बदलत असून, सध्या पायात घट्ट चोळणा,डोक्यावर मखमली रुमाल व दोन्ही हातात दोन भरजरी रुमाल एकसारखा असा पोशाख केलेला असतो. गजी मंडळातील मोहर्या व ढोल्यायांचा ड्रेसकोड हे गजी मंडळाचे विशेष आकर्षण असते.
पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातल्या बहुसंख्य गावात हा खेळ खेळला जातो. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना दिल्ली येथे लाल किल्ल्यावर 26 जानेवारीला गजीनृत्य सादर करायला बोलावले होते. त्यावेळी हे लोकनृत्य दिल्लीकरांचे मोठे आकर्षण ठरले होते. नंतरदेखील लाल किल्ल्यावर हे नृत्य सादर करायला संधी मिळाली होती. गजी मंडळ ही लोककला म्हणजे एक सांस्कृतिक ठेवा आहे. वारसा आहे. पण नव्या पिढीला त्याच्याबाबत जास्त आकर्षण नाही. त्यामुळे काही भागातील ही लोककला लोप पावत चालली आहे. या संस्कृतीचे जतन करून त्याची जोपासना व्हायला हवी आहे. सभा, समारंभातून, यात्रांमधून ही कला जिवंत राहण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment