रस्त्यावर फिरणारे मोकाट कुत्रे खूप मोठी समस्या बनली आहे. कुत्र्याच्या चावण्यामुळे होणारा 'रॅबीज जितका जीवघेणा असतो, त्यापेक्षाही जीवघेणे असते ते रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने वाहन घसरून होणारा अपघात. यात अनेकांनी आपला अमूल्य जीव गमाविला आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे मनपाचे काम आहे. तो सामान्यांच्या कक्षेबाहेरचा विषय आहे. पण, रॅबीजपासून बचाव हा नक्कीच आपल्या हातात आहे.
संपूर्ण जगात २८ सप्टेंबर हा दिवस जागतिक श्वानदंश (रॅबीज) दिन म्हणून पाळण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केल्यानंतर रॅबीजवर नियंत्रणात्मक उपाय योजण्यासाठी जनमाणसात जागृती निर्माण करण्याचा मुख्य उद्देश यामागे आहे. रॅबीज हा प्राण्यांना व मानवाला होणारा जीवघेणा रोग आहे. हा रोग कुत्र्यांपासून, जंगली कोल्ह्य़ांपासून, वटवाघुळापासून चावा घेतल्यास होतो. या रोगापासून बचाव करण्यासाठी 'लुईस पाश्चर' या प्रसिद्ध शास्त्रज्ञाने ६ जुलै १८८५ रोजी रॅबीज प्रतिबंधक लसीचा शोध लावला.
साधारणत: लहान मुलांना कुत्रा चावण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळेच रॅबीजमुळे होणार्या मृत्यूंमध्ये साधारणत: पन्नास टक्के मृत्यू ५ ते १५ या वयोगटातील बालकांचा असतो, असे मत जागतिक आरोग्य संस्थेने व्यक्त केले आहे. भारतात याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
रॅबडो व्हायरस नावाचा विषाणू रोगट प्राण्यांच्या लाळेतून आढळतो. हा रोग कुत्रा चावल्यामुळे जास्त प्रमाणात होतो. दंशमार्गाने रॅबीजचे विषाणू मानवाच्या शरीरात प्रवेश करतात आणि शरीराच्या मज्जातंतूपर्यंत पोहोचतात. मेंदूमध्ये ते बहुगुणीत होऊन मेंदूला सूज येते, त्याला 'इनसेफॅलायटीस' असे म्हणतात. मेंदूमधून हे रॅबीजचे विषाणू लाळोत्पादक ग्रंथीत शिरतात आणि त्यानंतर लाळेत या विषाणूंचा प्रादुर्भाव जाणवायला लागतो. रोगट प्राण्याच्या पंजाने खाजविल्यामुळे देखील हा रोग होतो.
कारण प्राण्यांना पंजे चाटण्याची सवय असते. प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांना वायुरूपी विषाणूंच्या श्वसन मार्गाद्वारेदेखील हा रोग होतो. पावसाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात दिसणार्या या रोगाचे विषाणू मानवाच्या शरीरात पाच दिवसांपासून ते एक वर्षपर्यंत कुठलेही लक्षणे न दाखविता राहू शकतात.
रॅबीस झाल्यास दिसणारी लक्षणे
१) रोग्याला ताप येणे, डोकेदुखी, भूक मंदावणे तसेच जास्त प्रमाणात उलट्या होतात.
२) या रोगाची लागण झाल्यानंतर शरीराचे मज्जातंतू, गळयाचे स्नायू प्रभावित करतात. त्यामुळे गळ्याच्या स्नायूंच्या अर्धांग वायूमुळे रोग्याला स्वत:ची लाळही गिळता येत नाही. त्यामुळे रोग्याच्या गळ्यातून लाळ व फेस बाहेर पडत राहतो.
३) चावलेल्या ठिकाणी वेदना, खाज सुटते. त्या भागात बधिरता येऊन मुंग्या येतात. रोगी सुस्त राहतो.
४) गळयाला सूज येते व त्याला पाणीदेखील गिळता येत नाही. रोगी पाण्याला घाबरतो म्हणून या रोगाला हायड्रोफोबीया असेदेखील म्हणतात.
उपाय
रोगाची लागण झाल्यानंतर उपयुक्त अशी प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध नाही. म्हणूनच या रोगापासून बचाव करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा.
रॅबीज रोगप्रतिबंधक लस लावून घेणे हा एकमात्र प्रतिबंधात्मक उपाय असून, त्यामुळे प्राण वाचू शकतो. कुत्रा चावला असता माणसाला तीन इंजेक्शन घ्यावे लागतात, तर कुत्र्याला हा रोग झाला असेल तर त्याला सहा इंजेक्शन 0, ३, ७, १४, २८ आणि ९0 या दिवसांत त्वचेच्या खाली लावावे लागतात. २८ सप्टंेबर हा दिवस जागतिक श्वानदंश दिवस म्हणून साजरा केला जातो.
या दिवसाचे औचित्य साधून जगभरात या दिवशी सावधानता रॅली, कॅम्प, रॅबीज प्रतिबंधक लसीकरण शिबिरे, परिपत्रके तसेच टीव्हीवर माहिती देऊन लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम केले जाते.
No comments:
Post a Comment