Friday, 27 September 2019

गानसम्राज्ञी लता मंगेशकर


लता मंगेशकर यांनी केवळ भारतीय पार्श्‍वगायन क्षेत्रातच आपली मोहोर उमटवली नाही तर चाहत्यांच्या हृदयावरदेखील त्यांनी अधिराज्य केलं आहे. लतादीदींना गाण्याचा वारसा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला. मास्टर दीनानाथ मंगेशकर म्हणजे मराठी नाट्य-संगीतातील मोठं नाव. लतादीदी सांगतात, घरात संगीताचंच वातावरण असायचं. आई गायची नाही. पण तिला गाणं समजायचं. वडील तर सकाळी साडेपाच वाजल्यापासूनच तानपुरा घेऊन बसायचे. एकदा एका शिष्याला ते गाणं शिकवत होते.
संध्याकाळी त्यांना कामानिमित्त बाहेर जावं लागलं, तर त्यांनी त्या मुलाला रियाज करायला सांगितलं. मी बाल्कनीत बसून त्याचं गाणं ऐकत होते. त्याला म्हणाले, तू ही बंदीश चुकीची गात आहेस. ही अशी गातात. मी त्याला ती बंदीश कशी गातात, हे दाखवलं. इतक्यात वडील आले आणि मी तिथून पळाले. त्यावेळी मी चार-पाच वर्षांची होते. तो मुलगा गेल्यावर बाबा आईंना म्हणाले, गायक इथे घरी आहे आणि मी परक्यांना शिकवतोय. दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजता वडिलांनी लतादीदींना तानपुरा दिला आणि तिथून या गानसम्राज्ञीच्या गाण्याची सुरुवात झाली.
आयुष्यभर संगीताची सेवा करणार्‍या लतादीदींनी लग्न केलं नाही. याबद्दल त्या म्हणतात, ते राहून गेलं.. त्या सांगतात, घरातील प्रत्येकाची जबाबदारी माज्यावर होती. अशात अनेक वेळा लग्नाचा विचार मनात आला तरी ते करू शकले नाही. खूप कमी वयात मी काम सुरू केलं. कामही भरपूर होतं. वाटलं लहान भावंडांना मार्गी लावावं, मग विचार करू. त्यानंतर बहिणीचं लग्न झालं. त्यांना मुलं झाली. त्यांना सांभाळायची जबाबदारी होती. आणि मग असं करतंच वेळ निघून गेली.
वडिलांच्या मृत्यूनंतर लतादीदींनीच त्यांच्या संपूर्ण घराची जबाबदारी उचलली होती. मात्र आपण कठोर कधीच नव्हतो, असं त्या सांगतात. भावंडांसाठी मी आई आणि वडील दोन्ही भूमिका पार पाडल्या. मी त्यांना कधीच रागावले नाही. आमच्यामध्ये कधीच भांडण झालं नाही. सांगलीत आम्ही मोठय़ा घरात राहायचो. आमच्या वडिलांनी ते घर बांधलं होतं, असं त्या सांगतात.
अजून आठवतो तो काळ
लतादीदी सांगतात, त्या काळच्या सर्वच नट्यांसोबत माझी चांगली मैत्री होती. नर्गिस दत्त, मीना कुमारी, वहिदा रहमान, साधना, सायरा बानो सगळ्यांसोबत माझे जवळचे संबंध होते. दिलीपसाहेब मला छोटी बहीण मानत. नव्या लोकांमध्ये मला काजोल आणि राणी मुखर्जी आवडतात.
लतादीदी सांगतात, आम्ही काम सुरू केलं तो काळ कठीण होता. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी गाण्यासाठी पळावं लागायचं. ऊन, वारा, थंडी, पाऊस कशाचीच तमा न बाळगता फिरावं लागायचं. मात्र जे काम करायचो, त्यात खूप समाधान मिळायचं. गाण्यांवर मेहनत घ्यायचो. त्यामुळे गाणी आवडायची. मुकेश भैय्या फारच सज्जन होते आणि किशोर कुमार तर कमालच. त्यांचे किस्से सांगायला बसले तर हसून हसून तुमचं पोट दुखेल. लतादीदींनी पार्श्‍वगायन सुरू करण्याआधी काही सिनेमांमध्ये भूमिकाही केल्या आहेत. कधी हिरोची बहीण तर कधी हिरोईनची.. छोट्या-छोट्या भूमिका त्यांनी केल्या. मात्र त्यांचं मन रमलं ते गाण्यातच.
काम करून आल्यावर वडिलांसोबत रियाज करायच्या. सहगल त्यांना फार आवडायचे. दिवसरात्र घरात फक्त सहगल यांचीच गाणी.
१९४२ मध्ये पार्श्‍वगायनाच्या दुनियेत त्यांनी पाय ठेवला आणि मग मागे वळून कधी पाहिलंच नाही. सिनेसृष्टी शंभरहून अधिक वर्षांची झाली आहे आणि त्यातली ७0हून अधिक वर्षं लतादीदींच्या गाण्यांनी सजली आहे आणि या गाण्यांची जादू तर येणार्‍या शेकडो वर्षांपर्यंत कायम राहणार आहे.

No comments:

Post a Comment