साधना शिवदासानी नय्यर तथा साधना या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. प्रसिद्ध नृत्यांगना साधना बोस यांच्या नाव व रूपावरून त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव साधना असे ठेवले होते. त्यांचा जन्म आताच्या पाकिस्तानातील कराची शहरात झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. साधना शिवदासानी यांचे पुढील शिक्षण मुंबईतच झाले. चर्चगेट येथील जय हिंद महाविद्यालयात त्या शिकल्या. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यशस्वी अभिनेत्री बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. वडिलांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत घेतली.
१५ वर्षांच्या साधनाला महाविद्यालयातील एका नाटकात भूमिका करताना काही निर्मात्यांनी पाहिले आणि चित्रपटांत काम करण्याची संधी दिली. १९५८ मध्ये 'अबाना' या भारतातील पहिल्या सिंधी चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याआधी १९५५ साली त्यांनी राज कपूर यांच्या 'श्री ४२0' या चित्रपटातील 'मुड मुडके न देख मुड मुडके' या गाण्यावर केलेल्या नृत्याने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. 'लव्ह इन शिमला' चित्रपटातील त्यांची हेअरस्टाईल पुढे 'साधना कट' या नावाने खूप प्रसिद्ध झाली. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साधना आणि आर.के. नय्यर यांचे प्रेम जमले. पुढे त्यांनी विवाह केला. साधना यांनी 'गीता मेरा नाम' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अनीता, मेरा साया आणि वो कौन थी या चित्रपटांमुळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये 'मिस्ट्री गर्ल' म्हणूनच ओळखले जायचे. मनोज कुमारसोबत त्यांनी केलेल्या 'वो कौन थी' चित्रपटातील त्यांचा डबल रोल खूप गाजला. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर नामांकनही मिळाले. हेअर स्टाईलप्रमाणेच साधना यांच्या कपड्यांची स्टाईलदेखील बॉलिवूडमध्ये हिट ठरली होती. ७0 च्या दशकात टाइट फिटिंगची चुडीदार सलवार आणि कुर्ता ही स्टाईलदेखील त्यांनीच इंडस्ट्रीमध्ये आणली. त्यांचा अभिनय मनमोकळा व नैसर्गिक होता. मुख्य म्हणजे त्यावर कोणाही बुजुर्ग अभिनेत्रीची छाप नव्हती. कॅमेरासमोर त्या घरात वावरावे तशा सहज वावरायच्या. अखेर कर्क रोगाशी झुंज देताना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात त्यांचे २५ डिसेंबर २0१५ रोजी निधन झाले.
No comments:
Post a Comment