लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. मनोज नरवणे हे आता लेफ्टनंट जनरल डी अंबू यांची जागा घेणार आहेत. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत हे ३१ डिसेंबर रोजी नवृत्त होत आहेत. त्यानंतर नरवणे हे लष्करप्रमुखपदाच्या शर्यतीतसुद्धा दिसतील.
नरवणे मराठमोळे असून ते मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय आणि प्रारंभीचे लष्करी शिक्षण पुण्याच्या 'ज्ञानप्रबोधिनी'त झाले आहे. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते जून १९८0 मध्ये लष्करात दाखल झाले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे 'इन्स्पेक्टर जनरल', स्ट्राईक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील 'जनरल ऑफिसर इन कमांडिंग', लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महुस्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. |
No comments:
Post a Comment