मुलांनो, तुमचे बाबा कधी कधी हॉटेलमधून पॅकिंग जेवण घेऊन येतात, तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की, चपाती, रोटी किंवा भाकरी अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळलेल्या असतात तसेच घट्ट, पातळ भाज्या अॅल्युमिनियम फॉइलच्या पिशव्यांमध्ये दिलेल्या असतात. आता धावपळीच्या या युगात पूर्वीसारखं कागदात पोळ्या किंवा इतर अन्न गुंडाळून घेऊन जाण्याचा प्रकार बंद झाला आहे. वर्तमानपत्राच्या कागदाची जागा आता चमकदार अॅल्युमिनियम फॉइलने घेतली आहे.
ऑफिसमध्ये जाताना किंवा मुंलांचा टिफिन बॉक्स भरताना बहुतांश जण अॅल्युमिनियम फॉइलचाच वापर करतात. अन्न जास्त वेळ गरम आणि ताजं राहतं म्हणून या चमकदार फॉइलमध्ये अन्न पॅक केलं जातं. शाळेत डबा खाताना मुलांना चपाती किंवा भाज्या गरम लागतात. फूड पॅकिंगमध्ये अॅल्युमिनियम फॉइल का वापरला जाते, आणि त्यात अन्न गरम कसे राहते हे आपल्याला माहिती आहे बरं?
सर्व प्रथम, हे जाणून घ्या की फॉइल अॅल्युमिनियम धातूपासून बनलेले असते. अॅल्युमिनियमची सर्वाधिक मात्रा आपल्या या पृथ्वीवर आढळते. 7 ते 8 टक्के पृथ्वीवरील कवच अॅल्युमिनियमपासून बनलेले आहे. अल्युमिनियमचा सर्वात मोठा स्त्रोत बॉक्साइट आहे (धातू मिश्रित एक प्रकारची माती). यात सामान्यत: 40 ते 60 टक्के अॅल्युमिनियम ऑक्साईड असते.
एका रासायनिक अभिक्रियाद्वारे त्यातून अॅल्युमिनियम धातू मिळविली जातो. लोह, तांबे, निकेल आणि जस्त या धातूंच्या तुलनेत त्याचे वजन एक तृतीयांश असते. याचा पृष्ठभाग उष्णतेची किरण परावर्तित करतो. याला गंज चढत नाही. घरात वापरल्या गेलेल्या अॅल्युमिनियम फॉइलमुळे ओलावा आणि हवेपासून रोखण्यास मदत होते.
अॅल्युमिनियम फॉइल तेलरोधक, गंधहीन आणि चव नसलेले आहे. या अॅल्युमिनियम फॉइलमध्ये अन्न उबदार आणि सुरक्षित राहते. कोणत्याही धातूची शीट, ज्याची जाडी 0.1270 मिमी किंवा त्यापेक्षा कमी असेल त्याला फॉइल म्हणतात. अॅल्युमिनियम इतके मऊ असते की त्यातून 0.00508 मि.मी. जाडीचे फॉइल बनवता येते. म्हणूनच फूड पॅकिंगमध्ये अॅल्युमिनियम फॉइलचा वापर केला जातो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली
No comments:
Post a Comment