Friday, 5 March 2021

चंदेरी साडी


एकेका परंपरेतून, इतिहास आपल्याला एकेक गोष्ट सांगत असतो. 'चंदेरी' या वस्त्र-परंपरेचा जन्म मध्य प्रदेशातील 'चंदेरी' या गावातला. पौराणिक कथांमध्ये वैदिक काळात, कृष्णाचा भाऊ शिशुपाल यानं चंदेरी वस्त्राचा वापर वेशभूषेसाठी केलेला उल्लेख आढळतो. नंतर चंदेरी कापडाचा उल्लेख अकराव्या शतकातील ऐतिहासिक दस्तऐवजांमध्येसुद्धा सापडतो. पुढे १३५० च्या सुमारास कोष्टी समाजाचे विणकर झाशीतून स्थलांतरित होऊन मध्यप्रदेशातील चंदेरी गावात स्थायिक झाले आणि मोठ्या प्रमाणात चंदेरी कापड विणू लागले. तेव्हा मुघल सरदार आणि त्यांच्या राण्या मोठ्या हौशीनं चंदेरी कापडाचे अंगरखे शिवत असत. त्यामुळे या साड्यांच्या बुट्ट्यांवर सुंदर मुघल नक्षीकामाचा प्रभाव पडलेला दिसतो. सतराव्या शतकातील 'मझिर-ए-आलमगिरी'मध्ये एक संदर्भ आढळतो, आलमगीर औरंजेबानं 'खिलत'साठी, (खिलत म्हणजे शाही-अंगरखा) चंदेरी गावातून, सोन्याचांदीचे जरीकाम केलेले सुंदर चंदेरी कापड बनवून घेतल्याचा उल्लेख आहे.

पुढे १९१० मध्ये ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी चंदेरी साड्या मोठ्या प्रमाणात विणून घेतल्या आणि त्या उद्योगाला पुरुज्जीवन दिलं आणि चंदेरीला सोन्याचे दिवस आले! त्या काळात राजघराण्यातल्या स्त्रिया, सोन्या-चांदीची जर वापरून विणलेल्या उंची चंदेरी साड्या खास हातमागावर बनवून घेत असत. पुढे इंग्रजांच्या काळात पॉवरलूम आल्यावर, चंदेरी साड्यांचा उद्योग डबघाईला आला; पण काही वर्षांनी चंदेरी गावातील विणकरांनी हातमागावर नवनवीन प्रयोग केले आणि त्यामुळे चंदेरी साडीला भारतभर मागणी वाढू लागली. सुरतची खास 'जर' वापरून या साड्या कॉटनमध्ये, सिल्कमध्ये आणि कॉटन-सिल्कमध्ये बनत असल्यामुळे अगदी छोट्या कार्यक्रमांपासून ते मोठ्या कार्यक्रमांपर्यंत कुठंही नेसता येतात. शिवाय या साड्या तलम आणि हलक्या-फुलक्या असल्यामुळे कोणत्याही ऋतूत आरामात वापरता येतात. हलकी चमक असणाऱ्या या साड्या नेसल्यावर एकदम 'ग्रेसफूल' वाटतात. सध्या 'पेस्टल शेड'च्या चंदेरी साड्यांना, उच्च अभिरुचीच्या ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. चंदेरी साडीच्या खासियतीमुळे, या साडीला स्वतःची अशी एक ओळख प्राप्त झाली आहे आणि त्यामुळे या साडीला सरकारकडून 'भौगोलिक स्थानदर्शक' (जिऑग्राफिकल इंडिकेशन) हे प्रमाणपत्रही मिळालं आहे. तुम्ही हातमागावरच्या साड्यांच्या प्रेमात असाल, तर सुंदर बुट्यांची चंदेरी साडी तुमच्या संग्रहात असायलाच हवी!


No comments:

Post a Comment