Sunday, 7 March 2021

अजूनही संघर्ष संपला नाही


आजही महिलांना विविध आघाड्यांवर मोठा संघर्ष करावा लागत आहे. पण प्रत्येकानेच आशावादी असायला पाहिजे. महिला सक्षमीकरणाने आज बराच वेग घेतला आहे. पण असे असले तरीही महिलांना असंख्य अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. दर दिवशी नवे प्रश्न उभे राहात आहेत. पण या सर्व अडचणींवर मात करून महिला मोठी प्रगती करून पुढे जात आहे. प्रत्येक समस्येला, प्रश्नाला नव्याने तोंड देत आहेत. आणि हे सगळे वर्षानुवर्षे असेच सुरू आहे. हा खरे तर न संपणारा संघर्ष आहे. स्त्रियांचा व्यवस्थेशी सुरू असणारा वाद अद्यापही संपुष्टात आलेला नाही.

या सगळ्या परिस्थितीतून जाऊन निघालेल्या महिला मात्र अजिबात मागे हटलेल्या नाहीत. त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. समाजाच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. अनेक महिलांनी स्वत: कळ सोसून समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न केले आहेत. अशी समाजात असंख्य उदाहरणे आहेत. त्यांच्याच कष्टाची गोड फळे आपण चाखत आहोत. जिजामातांनी शिवाजी महाराजांना स्वराज्याचा मंत्र दिला. सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे अशा अनेक महिलांनी स्त्रीशिक्षणाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. प्रसंगी समाजाच्या दूषणांचा स्वीकार केला. चुकीच्या प्रथा, परंपरांना विरोध केला. भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनीही बर्‍याच खस्ता खाल्ल्या. राणी लक्ष्मीबाईने भारतीय स्वातंत्र्यलढय़ात उडी घेतली. हिरकणी आपल्या मुलासाठी अत्यंत कठीण असा कडा उतरून गेली. अशा अनेक महिला आज प्रत्येकांसाठी सदैव प्रेरणादायी आहेत.

आज महिला शिकत आहेत. नोकरी करत आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये मोठे नाव कमावत आहेत. हे सगळे या थोर महिलांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले आहे. या महिलांमुळेच स्त्रियांना स्वत:च्या अस्तित्वाची जणिव झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन पुढे जाणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर पुढच्या पिढय़ांना समानतेच्या वातावरणात जगता यावे यासाठी आत्तापासून प्रयत्न करायला पाहिजे. भविष्यातल्या पिढय़ांना सुरक्षित वातावरण मिळायला पाहिजे यासाठी आजच्या पिढीने पुढाकार घ्यायला पाहिजे. मागच्या पिढय़ांकडून जसे स्त्रिया प्रेरणा घेतात त्याचप्रमाणे पुढच्या पिढय़ांनी प्रेरणा घेण्यासारखे काही तरी करून जायला पाहिजे. शिकलेल्या महिला आपल्या कुटुंबाला पुढे नेतात. कुटुंबाच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्याचप्रमाणे देशाच्या आणि समाजाच्या जडणघडणीतही महिलांनी मोठे योगदान दिले आहे. आणि आजही देत आहेत. पण समाजाच्या जडणघडणीला महिलांचा सहभाग आजही र्मयादित प्रमाणात आहे. कारण पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना पुरेशा संधी मिळत नाहीत. पण मिळाल्यानंतर महिला त्याचे सोने करतात आणि स्वत:ला सिद्ध करून दाखवतात. पण त्यांना तितकेसे प्रोत्साहन मिळत नाही. कारण मुळात पुरुषांचे वर्चस्व असणार्‍या समाजात स्वत:च अस्तित्व टिकवून ठेवण्याचे खूप मोठे आव्हान महिलांसमोर असते. त्यानंतर आपली गुणवत्ता, कौशल्याचा वापर समाजाच्या जडणघडणीसाठी कशा प्रकारे करता येईल याचा विचार त्या करू शकतात. मात्र या पुरुषप्रधान व्यवस्थेत स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवताना त्यांची अधिकाधिक ऊर्जा संपून जाते. म्हणूनच ही परिस्थिती बदलणे ही आजची गरज आहे.

महिलांना स्वत:च्या गुणवत्तेचा वापर करण्यासाठी अधिकाधिक संधी देणे गरजेचे आहे. पण महिलांना अशी संधी अजिबात मिळत नाही. असे म्हणता येणार नाही. मुळात महिला स्वत:च संधी मिळवत आहेत. आणि पुढेही जात आहेत. म्हणूनच आज स्त्री-पुरुष समानतेची गरज आहे. प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक बाबतीत ही समानता मिळणे आवश्यक आहे. असे झाले तरच महिला खूप वेगाने प्रगती करू शकतील आणि महिला सक्षमीकरण हा शब्द उच्चारावाच लागणार नाही. पुढच्या काही वर्षांमध्ये अशी सकारात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकेल अशी आशा करायला काहीच हरकत नाही.

महिलावर्गाला आजही आपले प्राधान्यक्रम ठरवणे खूप अवघड जाते. महिला अजूनही कुटुंबकबिल्यात अडकल्या आहेत. आजही महिलांना घर सांभाळून नोकरी करावी लागते. घर सांभाळणे हे महिलांचे पहिले कर्तव्य आहे. या मानसिकतेतून अजूनही आपला समाज बाहेर पडलेला नाही. वर्षानुवर्षांची ही परंपरा, ही विचारसरणी मागे टाकून पुढे जाणे महिलांना जमलेले नाही. नोकरी आणि घर अशा दोन्ही जबाबदार्‍या पेलताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागते. विविध आघाड्या पेलणार्‍या महिलांना सुपरवुमन म्हटले जाते. सुपरवुमन बनण्याच्या नादात महिला स्वत:चे अस्तित्वच हरवून बसल्या आहेत. आजही कुटुंबाची सगळी जबाबदारी स्त्रियांवर टाकली जाते. पण संसार हा दोघांचा असतो. त्यामुळे बायकोप्रमाणेच नवर्‍यानेही आपला वाटा उचलणे गरजेचे आहे. दोघांनीही घरातली जबाबदारी वाटून घ्यायला पाहिजे. असे झाले तर महिलांना मोकळीक मिळू शकेल. आज अनेक घरामध्ये पती-पत्नी मिळून संसाराची जबाबदारी पेलताना दिसतात. काही सकारात्मक उदाहरणेही समाजात पहायला मिळतात. पण हा आवाका वाढवायला पाहिजे. यासाठी लहानपणापासूनच समानतेचे संस्कार रुजवायला पाहिजे. घराघरातला मुलगा-मुलगी हा भेद संपवायला पाहिजे. आणि हा भेद संपविणे ही प्रत्येकाची गरज आहे.


No comments:

Post a Comment