Monday, 29 March 2021

साऊथ कॉटन साड्या


दक्षिण भारतात खूप मोठी 'टेक्सटाईल  आणि कॉटन जगभर प्रसिद्ध आहे. झाडावरच्या कापसाच्या बोंडांमधून  कापूस वेचल्यानंतर त्यातला ओलावा जाण्यासाठी  उन्हात वाळवून त्यातील सरकी म्हणजे बिया  काढल्या जातात. बिया काढण्याच्या प्रक्रियेला 'जिनिंग' म्हणतात. मग त्या कापसाचे पिंजण  म्हणजे 'कार्डिंग' केले जाते. त्या पिंजलेल्या  कापसाचे पातळ शीट्स तयार केले जातात. मग  ते शीट्स गुडाळून लांबट नळ्या तयार केल्या  जातात, त्यांना 'पेळू' किंवा हिंदीत 'पुनी' असे  म्हणतात. मग त्यातील एक धागा पकडून त्याला  टकळी किंवा चरख्याच्या साह्याने पीळ देत ओढला  जातो. त्यातून एक लांबलचक धागा तयार होतो,  याला सूत-कताई असे म्हणतात. याच सुतापासून पुढे हातमागावर खादीचे कापड बनते आणि हीच  सगळी प्रक्रिया जर मशीनवर केली तर जे कापड बनते त्याला सुती कापड म्हटले जाते. हाताने कातलेल्या सुतापासून, हातमागावर  साड्या बनवितांना हे सुत, हातमागावर थेट लागले  जाते. पण मशिनवर काढलेले सूत खूप पातळ असते म्हणून दोन ते तीन सूतांना पीळ देऊन, दोन ते तीन  प्लायचा धागा बनविला जातो आणि मग हे धागे  हातमागावर उभे- आडवे लावले जाऊन, 'हँडलूम  सुती साड्या' खूप निगुतीने विणल्या जातात.  हँडलूम साड्या बनवताना लागणारे कसब, वेळ  आणि मेहनत बघता हँडलूम साड्या, पॉवरलूम वर  विणलेल्या साड्यांपेक्षा का महाग असतात, याचे  उत्तर मिळते.

दक्षिण भारतातल्या कर्नाटक, केरळ, आंध्रपदेश, तेलंगण आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये, अनेक गावांमधून कॉटनच्या साड्या विणल्या जातात. या राज्यातल्या त्या त्या ठिकाणच्या स्थानिक विणकारांनी या साड्यांमध्ये वैविध्य आणले आहे, आणि त्यानुसार चेट्टीनाड, कोवाई, कसाबू, धारवाड, मंगलगिरी, वेंकटगिरी, गुंटूर, सनगुडी अशी असंख्य नावे त्या साड्यांना मिळाली आहेत. गावांच्या नावावरून किंवा डिझाईनच्या प्रकारावरून दक्षिणात्य सुती साड्यांना अशी वेगवेगळी नावे जरी पडली असली तरी एकत्रितपणे या साड्यांना 'साऊथ कॉटन साड्या' असेही म्हटले जाते.

या हातमागावर विणलेल्या साऊथ कॉटन साड्या नेसायला हलक्याफुलक्या जरी असल्या तरी, टिकायला खूप दणकट असतात. कोणत्याही ऋतूत नेसता येणाऱ्या या साड्या पिढ्यानपिढ्या टिकतात, त्यामुळे या मऊसूत साड्यांच्या ऊबदार गोधड्याही अतिशय सुंदर दिसतात. विशेष म्हणजे या साड्यांच्या डिझाईनवर दाक्षिणात्य मंदिरांचा आणि तिथल्या निसर्गाचा खूप प्रभाव पडलेला दिसतो. या साड्यांच्या कॉन्ट्रास्ट बॉर्डर्सही अप्रतिम असतात. या साड्यांवरच्या डिझाईनमध्ये बऱ्याचदा गोपुरं, कोयऱ्या, रुद्राक्ष, रुई फुले, वेलबुट्टी आणि पाने वगैरे असतात. ज्या भागात साडी विणली जाते त्या भागातील संस्कृती आणि नैसर्गिक साधनसंपत्तींचे, ती साडी प्रतिनिधित्व करत असते. त्यामुळे या साड्यांमधून दाक्षिणात्य सौंदर्याचे दर्शन घडते. (अनिकेत फिचर्स)

No comments:

Post a Comment