Monday, 22 March 2021

मराठीतील पहिल्या पंचांगाची छपाई


मराठीतील पहिल्या पंचागाच्या छपाईला यावर्षी 180 वर्षे पूर्ण झाली. 16 मार्च 1841 या दिवशी गणपत कृष्णाजी यांनी स्वत: हाताने पंचांग लिहून काढून ते शिळाप्रेसवर छापून प्रकाशित केले होते. छापील स्वरूपातील हे पंचांग सुरुवातीला समाजाकडून स्वीकारले गेले नाही. कर्मठांचा त्याला विरोध होता, मात्र त्यानंतर हळूहळू हा विरोध मावळत गेला आणि छापील पंचांगाचा वापर करायला सुरुवात झाली. त्याचा पाया गणपत कृष्णाजी यांनी घातला हे विसरून चालणार नाही. कालगणनेसाठी सध्या घरोघरी दिनदर्शिकेचा वापर होत असला तरी भारतीय संस्कृतीत पंचांगाला महत्त्व असल्याने आजही तुलनेत कमी प्रमाणात का होईना पण पंचांगाचा वापर सुरू आहे. अर्थात हा वापर ज्योतिषी, ज्योतिष अभ्यासक आणि पंचांगकर्ते यांच्याकडूनच मोठय़ा प्रमाणात केला जातो.

गणपत कृष्णाजी रायगड जिल्ह्यातल्या(पूर्वीचा कुलाबा जिल्हा) थळ गावाचे. त्यांचा जन्म 1799 चा. घरची गरिबी म्हणून ते वडिलांसोबत मुंबईत आले. मिशनऱ्यांच्या एका प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरीला लागले. 1839 च्या दरम्यान, अमेरिकन मिशनऱ्यांनी मराठीत छपाई करण्यास सुरुवात केली होती. अर्थात, ही छपाई ख्रिस्ती धर्मप्रसार साहित्याची असायची. ती पुस्तके पाहिल्यानंतर 1840 च्या सुमारास गणपत कृष्णाजी यांच्या मनातही असा छापखाना सुरू करून हिंदूू धर्मविषयक पुस्तके प्रकाशित करावी, असा विचार आला.  गणपत कृष्णाजींनी तिथे छपाईचं ज्ञान अवगत केलं. त्यांचं अक्षर वळणदार होतं. नक्षीकाम करण्यात ते पटाईत होते. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी लाकडी मशीन बनवलं. त्यानंतर शिळेवर मजकूर छापण्याचा स्वतःचा शिका प्रेस त्यांनी उभा केला. हा पराक्रम त्यांनी वयाच्या पंचविशीत केला.त्यांचा हा छापखाना बोरीबंदर येथे जुन्या जांभळी मशीदजवळ होता. तो नंतर मांडवी कोळीवाड्यात आणला.  कालांतराने त्यांच्या छापखान्यात त्या काळातील सर्व मराठी पुस्तकांची छपाई होऊ लागली. कारण मराठी छपाई करणारा, मराठी माणसाच तो तेव्हा पहिलाच, तसाच एकमेव छापखाना होता.पूर्वीच्या काळी पंचांगकर्ते किंवा ते जाणणारे लोक त्या त्या गावात किंवा पंचक्रोशीत लोकांच्या घरोघरी जाऊन पंचांगाचे वाचन करत असत. तसेच गुढीपाडव्यापासून पुढे वर्षभरात येणाऱ्या सणांची माहिती वाचून दाखवत असत. त्यामुळे मराठीतील पहिले पंचांग छापून ते प्रकाशित करणे ही पंचांगाच्या इतिहासातील मोठी व महत्त्वाची घटना आहे. या पंचांगाच्या एका प्रतीची किंमत अवघी आठ आणे इतकी होती.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत


No comments:

Post a Comment