Sunday, 7 March 2021

जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा


सतराव्या शतकापर्यंत भारत जगातला सर्वात श्रीमंत देश असल्याचे म्हटले जात होते. भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग याच गोष्टी संदर्भात एकदा म्हणाले होते की, 1700 साली भारत एकटा जगातील 22.6 टक्के संपत्ती निर्माण करीत होता. पण 1952 मध्ये हेच प्रमाण घसरून 3.8 टक्क्यांवर आले होते. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला, कधीकाळी ब्रिटनच्या राजमुकुटातील हिरा असलेला भारत, दरडोई उत्पन्नाच्या निकषांवर जगातील सर्वांत गरीब देश बनला होता.'  इंग्रजांनी आपला देश भिकेकंगाल बनवला हे खरेच आहे. शिवाय भारताचा सर्वात मौल्यवान , अनमोल आणि जगप्रसिद्ध कोहिनूरही हिराही आपल्या देशात नेला. कुतुबशाही राजवटीत गोवळकोंडा हे हिऱ्यांच्या खरेदी-विक्रीचे एक महत्त्वाचं जागतिक केंद्र होतं. पर्शियाहून आयात केलेल्या हिऱ्या-मोत्यांचाही येथे मोठ्या प्रमाणावर बाजार भरत असे.कुतुबशाही राजवटीपर्यंत गोवळकोंड्यात धनाचे पूर लोटत होते. नवलाख दिव्यांच्या द्वारकेसारख्या इथे रत्नांच्या ज्योती आणि माणिकांच्या वाती पाजळत होत्या. समृध्दी इथे वैभवात नांदत होती. विश्वविख्यात कोहिनूर हिरा याच किल्ल्यात झगमगत होता. गोवळकोंड्याच्या परिसरातील कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या कोल्लार येथील खाणीत इसवी सन 1656 मध्ये तो सापडला होता. टॅव्हर्नियर या फ्रेंच प्रवाशाने हा हिरा इसवी सन 1665 मध्ये औरंगजेबाच्या जमादारखान्यात पाहिला होता. सुलतान अली कुतुबशहाच्या कारकिर्दीत मीर जुमला याने हा हिरा शहेनशहा शहाजहान बादशहाला नजर केला. (त्या वेळी या हिऱ्याला पैलू पाडलेले नव्हते. त्याचे वजन 787 कॅरेट होते.) नादिरशहाच्या दिल्ली लुटीतून तो इराणला नेला. नादिरशहाच्या निधनानंतर (इसवी सन 1747) तो हिरा त्याचा नातू शाहरुख याने भेट म्हणून काबूलच्या अहमद शहाकडे दिला. त्याचा मुलगा शहा झमन व त्यानंतर सुलतान सुझा यांच्याकडे वंशपरंपरेने कोहिनूर हिरा जाऊन पोचला. इसवी सन 1812 मध्ये शहाचे कुटुंबीय लाहोरला असताना त्यांनी तो हिरा पंजाबचे महाराज रणजितसिंह यांना भेटीदाखल दिला. या विश्वविख्यात हिऱ्याचे हस्तांतराचे भ्रमण जवळजवळ पूर्ण झाले आणि तो भारत भूमीत परत आला; पण काळाने कूस बदली आणि ब्रिटिशांनी इसवी सन 1849 मध्ये पंजाब खालसा केले; तेव्हा हा कोहिनूर हिरा त्यांच्या हातात पडला. (तेव्हा त्याची किंमत दोन कोटी रुपये होती.) लॉर्ड लॉरेन्सने तो हिरा थेट व्हिक्टोरिया राणीला भेट म्हणून इंग्लंडला पाठवून दिला. आजही तो देदीप्यमान हिरा इंग्लंडच्या राजाच्या मुकूटात झगमगत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment