'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' या गाजलेल्या कवितेचे कवी यशवंत यांचा काव्यप्रवास हा एका प्रयत्नवादी आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वाच्या जीवनविकासाचा आलेख ओळखला जातो. त्यांच्या प्रेमकवितेत प्रीतिसाफल्य, तिची विफलता, मृत्यूवर मात करणारे तिचे चिरंजीवीत्व आदी छटांचे चित्रण आहे. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना 'महाराष्ट्र कवी' म्हणून गौरवण्यात आले. ते बडोदा संस्थानचे राजकवी होते. त्यांनी जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत रचले होते. कवी यशवंत म्हणजेच यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म ९ मार्च १८९९ रोजी सातारा जिल्ह्यातील चाफळ येथील. त्यांचे शालेय शिक्षण सांगलीला झाले. मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी पुण्यात लेखनिकाची नोकरी केली. कवी साधुदास (गोपाळ गोविंद मुजुमदार) यांचे काव्यरचनेसंबंधीचे मार्गदर्शन आरंभीच्या काळात त्यांना मिळाले. १९१५ ते १९८५ या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली. त्यांची मूळ प्रवृत्ती राष्ट्रीय स्वरूपाची कविता लिहिण्याकडे होती; मात्र इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. 'यशोधन' हा त्यांचा पहिला — लोकप्रिय कवितासंग्रह. त्यानंतरचे त्यांचे 'यशोगंध', 'यशोनिधि', यशोगिरी, 'ओजस्विनी' आदी काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. १९२२ मध्ये त्यांनी लिहिलेल्या 'आई' या कवितेतील गोडवा आजही कायम आहे. 'छत्रपती शिवराय' महाकाव्य, 'काव्यकिरीट' हे राज्यरोहणावरील खंडकाव्य, ‘घायाळ’ कादंबरी, 'मोतीबाग' हा बालगीतांचा संग्रह आणि 'जयमंगला' ही भावगीतांची प्रेमकथा त्यांनी रचली. १९५० मध्ये त्यांनी मुंबईत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले होते.
No comments:
Post a Comment