मराठीतील प्रसिद्ध नाटककार आणि कथा-कादंबरीकार जयवंत दळवी यांच्या नाटकांमुळे मराठी रंगभूमीला नवे चैतन्य लाभले. जबरदस्त ताकदीच्या व्यक्तिरेखा हे दळवींच्या नाटकांचे वैशिष्ट्य. त्यांच्या कथांवर आणि कादंबऱ्यांवर त्यांनीच नाटके लिहिली आणि ती प्रचंड गाजली, लोकप्रिय झाली. दळवींची 'चक्र' ही पहिलीच कादंबरी मराठीच्या अनुभव क्षेत्राची कक्षा वाढविणारी म्हणून वाखाणली गेली. दळवी यांची आणखी एक विशेष ओळख म्हणजे 'ठणठणपाळ'. त्यांनी 'पुलं'च्या साहित्यातील निवडक लिखाण वेचून 'पु. ल. देशपांडे : एक साठवण' हे अप्रतिम पुस्तक संपादित केले.
जयवंत दळवी यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी गोव्यातील हडफडे गावी झाला. त्यांचे बालपण सिंधुदुर्गातील आरवली गावात गेले. कादंबरी, स्तंभलेखन, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी कथा अशा सर्व प्रांतांत त्यांचे लेखन गाजले. त्यांचे १५ कथासंग्रह, १९ नाटके लोकप्रिय आहेत. 'गहिवर', “एदीन', 'रुक्मिणी', स्पर्श इत्यादी १५ कथासंग्रह; चक्र, 'स्वगत', ‘महानंदा’, 'अथांग', 'अल्बम' आदी २१ कादंबऱ्या; संध्याछाया', 'बॅरिस्टर', 'सूर्यास्त', 'महासागर', 'पुरुष', 'नातीगोती' आदी १९ नाटके दळवी यांनी लिहिली. 'लोक आणि लौकिक' हे प्रवासवर्णन आणि ‘सारे प्रवासी घडीचे’ हे कोकणातील विलक्षण व्यक्तींचे आणि त्यांच्या कर्तृत्वाचे, विक्षिप्तपणाचे चित्रण करणारे त्यांचे विनोदी पुस्तक वाचकप्रिय ठरले.
No comments:
Post a Comment