सहजसोपी शब्दरचना, जगण्यावर निस्सीम प्रेम करणारे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवणारे कवी म्हणून मंगेश पाडगावकर यांचे नाव नेहमीच अग्रणी राहिले आहे. वेंगुर्ला त्यांचे जन्मगाव. मुंबई विद्यापीठातून त्यांनी मराठी आणि संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर मिठीबाई आणि सोमय्या महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे त्यांनी शिकवले. पुढे 'साधना' साप्ताहिकाचे सहसंपादक, तर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात त्यांनी निर्माता म्हणून काम केले. कवी, गीतकार, ललित लेखक म्हणून परिचित असणाऱ्या पाडगावकर यांचा १९५० मध्ये 'धारानृत्य हा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला. 'वात्रटिका' हा काव्यप्रकार मराठीत त्यांनीच रूढ केला. उपहासात्मक कविता लोकप्रिय करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. बालगीत, भक्तिगीत, प्रेमगीत, भावगीत अशा काव्य प्रकारांत त्यांचा हातखंडा होता. “सांग सांग भोलानाथ', “दार उघड चिऊताई दार उघड, 'असा बेभान हा वारा', 'सांगा कसं जगायचं' या त्यांच्या कविता विशेष लोकप्रिय झाल्या. 'सलाम' या त्यांच्या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या गाण्यांनाही श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. आबालवद्धांच्या मनातील हळव्या कोपऱ्यात स्थान मिळवलेल्या या चतुरस्र कवीला महाराष्ट्रभूषण आणि 'पद्मभूषण' पुरस्कारानेही गोरवण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment