Thursday, 1 April 2021

स्मार्ट मुलांच्या स्मार्ट गोष्टी


'गोष्टी स्मार्ट बालचमू'च्या हा प्रथितयश लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांचा बालकथासंग्रह म्हणजे बाल-किशोरवयीन मुलांच्या समजुती, संवेदना, सकारात्मकता मूल्यभावासह भावविश्व गोष्टींचा नजराणा आहे. संकटकालीन परिस्थितीशी संघर्ष करीत समजूतदारपणे आपल्या कृतीतून आताच्या मुलांपुढे आदर्श घालून देणारे या कथांचे नायक-नायिका आहेत.मुलांच्या जगात आणि त्यांच्या परिसरात घडणाऱ्या प्रसंग- घटनांतून त्यांची गोष्ट पूर्ण होते. म्हणून या संग्रहातील बालचमू'स्मार्ट' आहेत आणि या गोष्टीही 'स्मार्ट' आहेत.

श्री. ऐनापुरे यांच्या बालकथा पाठ्यपुस्तकात, किशोर मासिक आणि विविध नियतकालिकांतून यापूर्वी वेळोवेळी प्रसिद्ध झाल्या आहेत. अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर या संस्थेने प्रकाशित केलेल्या या संग्रहात एकूण 19 कथा आहेत. या कथांचा आस्वाद घेताना मुलांना आणि रसिकांना यात आपलेच भावविश्वयेणार नाही, याची काळजी घेतो.  सापडल्याचा आनंद होईल. 'झोपडीतला संजू' या पहिल्याच कथेतल्या संजूवर जीवनमूल्ये जपण्याचे संस्कार झाल्याने तो त्याला त्रास देणाऱ्या मुलांवर आपल्यामुळे बालंट येणार नाही, याची काळजी तर घेतोच याखेरीज मैत्रीतून दिलेला शब्दही खरा करून दाखवतो.

'भूक लागल्यावर' या कथेतील निकिता आपला डबा मैत्रिणींना देऊन शाळेतल्या कॅन्टीनच्या चटपटीत पदार्थांवर ताव मारत असते. पण एकदा घरीच डबा विसरल्याने आणि दुपारच्या सुट्टीत मुसळधार पावसामुळे वर्गाबाहेर जाता न आल्याने मोठी फजिती होते. ती भुकेने व्याकूळ होते. अशा परिस्थितीत शाळेचा शिपाई तिच्या आईने भर पावसात आणून दिलेला डबा तिला देतो. ती आनंदाने खाते. भुकेचे महत्त्व यातून लक्षात येते. यातल्या कथा समकालीन असल्याने त्या वाचताना त्यांना त्या आपल्याच कथा वाटतात. या कथांमध्ये आपल्याला वृद्धांना, आईवडिलांच्या त्याच्या कामात मदत करणारी, अंधश्रद्धेला दूर ठेवणारी, चुका, वाईट सवयी यातून सुधारणारी, दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणारी मुलं भेटतात. 'मैत्रीचा अर्थ' या कथेत समता, बंधुता आणि एकात्मतेचा पाठ अनुभवयास मिळतो. 'आम्ही जिंकू' या कथेत जिद्द आणि मेहनतीचे फळ लक्षात येते.'पेरी जेड सिग्मा 090' आणि 'जुनं पुस्तक' या विज्ञान कथांमधून जीवन सुलभ झाल्याचे आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत असल्याचा साक्षात्कार होतो. कथा अनुभवकक्षातल्या असल्याने त्या मुलांना लगेच आपलंसं करतात.-लखन होनमोरे, सोन्याळ ता.जत जि. सांगली

पुस्तकाचे नाव-गोष्टी स्मार्ट चमूच्या

लेखक-मच्छिंद्र ऐनापुरे

अक्षरदीप प्रकाशन,कोल्हापूर

मूल्य-100 मात्र


No comments:

Post a Comment