Thursday, 1 April 2021

पळस फूल


वसंत ऋतूची चाहूल लागताच शेतात, माळरानावर फुललेला दिसतो तो पळस! तो जंगलात तर वणवा लागल्यासारखा दिसतो. तसा जंगलातला वणवा विदारकच असतो,पण पळसफुलांचा दिसणारा वणवा डोळे आणि मनाला आनंद देणारा ठरतो. असंही म्हणतात की, पळस हे जंगल नष्ट होण्याचे, दुष्काळाचे चित्र आहे. मात्र त्याचा दुसरा अर्थही आहे, जिथे काहीच उगवत नाही, अशा पडीक जमिनीवर पळस हमखास फुलतो. पळस जिथे दिसतात, तिथे काही काळी जंगले होती. मानवी हस्तक्षेपामुळे ती नष्ट झाली, असे त्यातून स्पष्ट होते. 

आणखी एक- वणवा लागल्यावर टिकून राहतो तो पळस. त्यामुळे पळस ही 'फायटर' वनस्पती आहे, असे म्हटले जाते. फ्लेम ऑफ द फायर' असे खुद्द इंग्रजांनी ज्याचे वर्णन केले आहे त्या पळसाच्या पानाफुलांपासून नैसर्गिक रंग मिळतोच, परंतु त्याचे औषधी फायदेही आहेत. रंगपंचमी किंवा धुळवडीला पानाफुलांपासून आणि खोडापासून नैसर्गिक रंग बनवले जातात. या रंगांच्या वापरामुळे आपल्या शरीराला आणि डोळ्यांना कसल्याच प्रकारचे अपाय होत नाहीत, उलट झालाच तर फायदाच होतो. अलीकडे वापरण्यात येत असलेल्या रासायनिक रंगांमुळे डोळे अधू होण्याचे व त्वचेला अपाय होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नैसर्गिक रंग वापरण्याची निसर्गप्रेमी शिफारस करताना दिसतात. त्वचेसाठी पळस फुल अत्यंत लाभकारी आहे. शरीराचा दाह कमी करण्यासाठी फुलांचा रस फायदेशीर आहे. पक्ष्यांसाठी पळसफुलांचा मधुरस आवडीचा असतो. साहजिक पळस फुलला की, पक्षी-किड्यांची मौज असते. हा मधुरस माणसांसाठीही चांगला असतो. या रसामुळे पोटातील विकार दूर होतात. पळसाच्या झाडावर लाखाचे किडे मोठ्या प्रमाणात येतात. त्यांची लाळ ज्वलनशील असते. हा पदार्थ दागिने बनवण्यासाठी उपयोगात येतो. पूर्वी या पानांपासून मोठ्या पंगतीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनवल्या जात. आता काळ बदलला असला आणि त्याची जागा प्लास्टिकने घेतली असली तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. 

20 ते 25 फूट उंच असणाऱ्या पळसाला संस्कृतमध्ये पलाश म्हणतात. याचा अर्थ फुलांनी डवरलेले झाड असा होतो. पळसाची फुले श्री सरस्वती आणि कालिमाता या दोन्ही देवींच्या पूजेसाठी भक्तिभावाने वापरली जातात. कुठेही गेले तरी 'पळसाला पाने तीन' अशी म्हण प्रचलित झाली आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment