Friday, 16 April 2021

बोमकाई साडी


ओडिशा राज्यातल्या निसर्गात आणि  वस्त्र परंपरेत एक सुंदर वैविध्य आहे.  ओडिशाच्या- संबलपुरी, बोमकाई, टसर,  बेहमपुरी पट्टा, खन्दुआ पट्टा, कोटपाड, हबसपुरी,  पासापल्ली, डोंगरीया अशा अनेक हँडलूम साड्यांना  खास ओळख आहे. आज आपण यातील बोमकाई  साडीची ओळख करून घेऊ. ओडिशा राज्यातल्या,  गंजाम जिल्ह्यात 'बोमकाई' गावात ही साडी खूप  वर्षापासून विणली जात आली आहे. पन्नास-साठ  वर्षांपूर्वी बोमकाई गावातील 'भूलिया' समाजातील  काही विणकर सुबर्नपूर जिल्ह्यातील सोनपूर गावी येऊन  स्थायिक झाले आणि बोमकाई साडी विणू लागले.  तेव्हापासून बोमकाई साडी सोनपुरी नावानंही ओळखली  जाऊ लागली.

'बोमकाई' साडी जास्त करून सिल्कमध्ये विणली  जाते; पण त्या साड्यांवरचे सुंदर नक्षीकाम बघून कॉर्पोरेट जगताकडून कॉटन बोमकाई साड्यांची मागणी  वाढू लागली आहे. काँट्रास्ट काठ-पदर असलेल्या कॉटन  बोमकाई साड्या अतिशय सुंदर दिसतात. निसर्गातील  सुंदर रंगसंगती या साड्यांमध्ये परावर्तित झालेली दिसते. 

ओडिशातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते- विणकर रामकृष्ण  मेहेर यांनी बोमकाई साडीत आणि संबलपुरी साडीत  खूप सुंदर प्रयोग केले आहेत. त्यांनी कॉटन बोमकाई  साडीवर सिल्कच्या धाग्यानं केलेलं नक्षीकामही अप्रतिम  दिसतं. रुद्राक्ष बॉर्डर ही बोमकाई साडीची खासियत  म्हणावी लागेल. रुद्राक्ष डिझाईन म्हणजे रुद्राक्षासारखी  दिसणारी छोटी छोटी फुलं असतात. या साडीच्या  पदरावरची आणि बुद्ध्यांची नक्षी पूर्वी हातानं एक एक धागा शटलनं आडवा टाकून केली जात असे. कधी कधी  'जाला' पद्धतसुद्धा वापरली जायची. मात्र, या पद्धतीनं  काम करताना खूप वेळ जात असल्यामुळे आता 'डॉबी'  किंवा 'जकार्ड' पद्धतीनं हे नक्षीकाम केलं जातं. अगदी  छोट्या बुट्ट्यांसाठी 'डॉबी' आणि भरजरी पदारांसाठी  'जकार्ड' पद्धत वापरली जाते. 'जकार्ड'च्या प्रक्रियेत  ग्राफ पेपरवर आधी डिझाईन काढून घेतलं जातं, मग  त्या ग्राफ पेपरनुसार एका खास मशिनवर जाड कार्ड्सवर  पंचिंग मशिननं छिद्र पाडली जातात. मग तो कार्ड्स  हातमागावर अशा पद्धतीनं लावली जातात, की हव्या  असलेल्या डिझाईनच्या पॅटर्नमध्ये धागे वर-खाली होतात  आणि ग्राफ पेपरवरची नक्षी साडीवर उतरते. विणकर  खूप निगुतीनं हे काम करतात आणि बारीक कलाकुसर  साडीवर उतरवतात. नक्षीसाठी वापरण्यात येणाऱ्या आडव्या धाग्यांमध्ये कधी कधी 'जर'सुद्धा टाकली जाते, त्यामुळे 'जर' असलेली नक्षी अजून उठून दिसते. असं हे भरतकाम केल्याप्रमाणे विणलेली डिझाईन 'कॉन्ट्रास्ट' काठा-पदरावर असते. बऱ्याचदा ही साडी मध्ये प्लेन असते किंवा कधीकधी अंतरावर छोटे युट्टे असतात; पण पदर मात्र सुंदर बारीक नक्षीकामानं भरलेला असतो. बोमकाई साडीच्या नक्षीकामावर ओडिशाच्या निसर्गसौंदर्याचा, पौराणिक घटकांचा, नक्षीदार मासे, पक्षी, कासव व मोरांचा, गोपुरांचा आणि मंदिरातल्या सुंदर कोरीवकामाचा प्रभाव पडलेला दिसतो. कधी कधी या साडीत दोन कलाप्रकारांचा सुंदर मेळ असतो. बोमकाईच्या रुद्राक्ष बॉर्डरला 'इकत' पद्धतीनं टेम्पल बॉर्डरची किनार दिली जाते किंवा पदरावरही 'इकत' आणि बोमकाईची भरतकामासारखी नक्षी यांची गुंफण केलेली आढळते. या प्रकाराला 'बांधा-बोमकाई' असं म्हटलं जातं. ओडिशातील काही विणकरांनी अशा काही डिझायनर बांधा-बोमकाई' साड्या विणल्या आहेत, की ज्यात जगन्नाथ मंदिराची कलाकुसर आणि कृष्ण-जीवनावर आधारित घटनाक्रम उतरवला आहे. या साड्या म्हणजे कलाकुसरीचा उत्तम नमुना मानल्या जातात आणि अशा साड्यांना देशात आणि परदेशात मोठी मागणी आहे.


No comments:

Post a Comment