Thursday, 22 April 2021

मंगळावरील हेलिकॉप्टर उड्डाणामागे डॉ. बलराम


अलिकडे भारतीय वंशाच्या मंडळींनी जगभरात मोठा डंका वाजवायला सुरुवात केली आहे. परदेशातील राजकारण असो की संशोधन सगळ्याच क्षेत्रात भारतीय वंशाचे लोक आघाडीवर आहेत. त्यामुळे साहजिकच भारतीयांनादेखील त्याचा अभिमान वाटत आहे. आता यात आणखी एका व्यक्तीची भर पडली आहे, ती म्हणजे डॉ.जे बॉब बलराम यांची. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने नुकतेच मंगळ ग्रहावर इंज्युनिटी हेलिकॉप्टर उडवण्यात यश मिळवले आहे. यात डॉ.बलराम यांचा सिंहाचा वाटा आहे. 

' नासा' ने सुमारे सात महिन्यांपूर्वी पर्सिवियरेंस रोव्हर मंगळावर पाठवला होता. तो 19 फेब्रुवारी 2021 रोजी यशस्वीरीत्या उतरला होता. अब्जो वर्षांपूर्वी मंगळावर असलेल्या सूक्ष्मजीवांच्या खुणांच्या शक्यतेचाही अभ्यास करणार आहे. यासाठी यानाने जवळपास अर्धे अब्ज किलोमीटर अंतर पार केले आहे. यासोबत छोटेखानी हेलिकॉप्टरही पाठवण्यात आला होता.  

पृथ्वीशिवाय अन्य ग्रहावर उड्डाण करणारे हे पहिलेच छोटे हेलिकॉप्टर ठरले.  हे हेलिकॉप्टर आधीपेक्षा चांगल्या स्थितीत असून त्याने आपल्या सोलर पॅनेल्सवर साठलेली धूळही झटकली आहे. त्यामुळे त्याला आधीपेक्षा जास्त सौरऊर्जेचे उत्पादन करता येत आहे.   या इतिहास रचणाऱ्या हेलिकॉप्टरच्या निर्मितीमागे एका भारतीय माणसाचा मेंदू आहे. भारतातच आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेल्या जे. बॉब बलराम या भारतीय वंशाच्या संशोधकाने या हेलिकॉप्टरचे डिझाईन बनवलेले आहे. मूळचे दक्षिण भारतातील बलराम 'नासा' च्या जेट प्रोपलशन प्रयोग शाळेत काम करतात. त्यांनीच इंजिन्यूटी हेलिकॉप्टर बनवले असून ते या मार्स हेलिकॉप्टर मोहिमेचे मुख्य अभियंताही आहेत. ते जेपीएलमध्ये 35 वर्षांपासून रोबोटिक्स टेक्नॉलॉजिस्ट आहेत. १९६० च्या दशकात दक्षिण भारतात बलराम यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना अंतराळ संशोधन आणि रॉकेट्रीमध्ये रस होता. त्यांनी जे. कृष्णमूर्ती यांनी स्थापन केलेल्या ऋषी व्हॅली शाळेत शिक्षण घेतले. नंतर  त्यांनी आयआयटीतून (मद्रास) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. न्यूयॉर्कच्या रेनसिलर पॉलिटेक्निक इंसिट्यूटमधून कॉम्प्युटर अँड सिस्टम इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली.

हेलिकॉप्टरचे उड्डाण यशस्वी झाल्यावर डॉ.बलराम म्हणाले, मंगळाच्या वायूमंडळात कोणतीही वस्तू उतरवणे आणि उडवणे फार कठीण आहे. कारण तेथील वायूमंडळ पृथ्वीवर आहे तसे जड नाही. खूपच हलके आहे. त्यामुळे नासाकडून मंगळ ग्रहावर हेलिकॉप्टर उडवणे हे राइट ब्रदर्स यांच्या विमानाच्या पहिल्या उड्डाणासारखेच आहे. राइट बंधूंनी विमान तर फक्त 12 सेकंद उडवले होते. पृथ्वीवरून नियंत्रित करण्यात आलेले हे हेलिकॉप्टर मात्र मंगळावर 30 सेकंद उडाले होते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment