Wednesday, 28 April 2021

माऊंटेन मॅन सोहन सिंह


माणसं झपाटलेली असतात म्हणजे काय असतात, याचं उदाहरण द्यायचं झालं तर राजस्थानमधल्या सोहन सिंह या साठ वर्षीय इसमाचं देता येईल. त्याच्या गावातील जनावरांना पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी डोंगराला वळसा घालून जावं लागायचं किंवा मोठ्या चढणीचा डोंगर चढून जावं लागायचं. यासाठी बरीच पायपीट करावी लागायची. मोठा त्रास सहन करावा लागायचा. सोहन सिंह यांनी चक्क तो डोंगर पोखरून काढला आणि तिथून जनावरांना जायला रस्ता तयार केला. यासाठी सोहन सिंह यांना तब्बल दहा वर्षे लागली. पण त्यांनी हे काम झपाटल्यागत करून गावाला एक आदर्श घालून दिला. त्यांना सुरुवातीला वेड्यात काढणारे लोकच आता त्यांचे कौतुक करत आहेत.

आपल्याला डोंगर फोडून गावाला शहराशी जोडणारा जवळचा रस्ता बनवणाऱ्या दशरथ मांझी यांच्याविषयी ठावूक आहेच. आपल्या देशात अशी अनेक माणसं आहेत की, जी स्वतः मेहनत घेऊन दुसऱ्यांसाठी सुविधा निर्माण करतात. राजस्थानमधील आडीकांकर नावाच्या गावातील सोहन सिंह या व्यक्तीनं अशीच मेहनत घेतली. त्यांनी जनावरांना तळ्याकडे जाऊन पाणी पिण्यासाठी डोंगर फोडून रस्ता बनवला आहे. त्यासाठी त्यांनी दहा वर्षे सातत्याने मेहनत केली. रस्ता बनवण्यासाठी त्यांनी छन्नी-हातोडी आणि फावड्यासारख्या अवजारांचा उपयोग केला. दहा वर्षांपूर्वी त्यांनी असा रस्ता बनवण्याचा संकल्प केला होता. गावातील जनावरांसाठी डोंगरापलीकडे असणारे  तळेच मुख्य जलस्रोत होते. तिथे जाण्यासाठी डोंगरातील चढणीची, काट्याकुट्यांची आणि खडकाळ वाट पार करावी लागत असे. जनावरांचे त्यासाठी होणारे हाल पाहून सोहन सिंह यांनी हा डोंगर फोडून चांगला रस्ता तयार करण्याचे ठरवले. यासाठी गावातील लोकांची मदत होईल, या आशेनं त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली, मात्र  गावातील लोकांनी त्यांना कोणतेच सहकार्य केले नाही. उलट त्यांचीच टर उडवली. त्यामुळे त्यांनी स्वतःच एक दृढ संकल्प करून मेहनत घेण्यास सुरुवात केली. आता त्यांनी हा रस्ता तयार केला असून या रस्त्यावरून गावातील जनावरे सहजपणे तळ्याकडे जाऊ शकतात. माता-पित्याच्या निधनानंतर सोहन सिंह एकटेच गावात राहत आहेत. आजही वयाच्या साठाव्या वर्षी ते एका झोपडीवजा घरात एकटेच जीवन कंठत आहेत. मात्र त्यांना आपण गावाच्या उपयोगाला आल्याचे समाधान आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment