Wednesday, 28 April 2021

हुंडाबंदी असलेलं गाव


आपल्या देशात अनेक प्रथा-परंपरा आहेत. काही रूढीवादी आहेत तर काही पुरोगामी. काही श्रद्धा जोपासतात तर काही अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. काही परंपरा स्त्रियांवर बंधने घालतात तर काही स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक महत्त्व देऊन त्यांची काळजी घेतात. असंच एक मुलींना सन्मान देणारं गाव आहे ते म्हणजे वायील. श्रीनगरच्या गंदरबल जिल्हयात निसर्गाच्या कुशीत विसावलं  हे गाव आहे. या गावाला 'बडा घर' असेही म्हटलं जातं. याला कारणही तसंच आहे. श्रीनगरमधीलच नव्हे तर अख्ख्या देशातलं हे असं एकमात्र गाव आहे, जिथे लग्नात सोनं-नाणं किंवा हुंडा म्हणून काहीही द्यायला आणि घ्यायला पूर्ण बंदी आहे. विशेष म्हणजे या गावात मुलीच्या कुटुंबियांना लग्नात एक पैसाही खर्च करावा लागत नाही. जर एखाद्या वरपक्षांकडून हुंडा मागितला गेलाच तर मुलाकडच्या मंडळीवर सामुहिक सामाजिक बहिष्कार टाकला जातो. कुठलाही संबंध किंवा व्यवहार या घरासोबत केला जात नाही. इतकंच नव्हे तर हुंडा मागणाऱ्या वर पक्षाच्या घरी कुणी मयत झालं तरी त्याच्या अंत्यविधीलाही कुणी जात नाही.'बड़ा घर' गावातील या कडक नियमामुळे तिथल्या लोकजीवनावर चांगला परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. मागील ३० वर्षात गावात घरगुती हिंसा किंवा हुंड्यासंबंधी एकही घटना घडलेली नाही. वधू पित्याला लग्नात काहीच खर्च येत नसल्यामुळे गावात योग्य वयात मुलींची लग्नं पार पडत आहेत. गावात बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंब आहेत. ते अकोट शाली विकून किंवा शेती करून आपला उदरनिर्वाह करतात, तर काही जण सरकारी अणि खासगी कंपनीत नोकरीला आहेत. 'बडा घर' गावात लग्न करून आपल्या मुलींना पाठवायला लोक तयार असतात.म्हणून या गावात मुलींना ओझं समजलं जात नाही. तसंच कुणावर हुंडा देण्यासाठी दबाव येऊ नये म्हणून गावातील ज्येष्ठ नागरिक मंडळी लक्ष ठेवून असतात. मुलींचा सन्मान करणाऱ्या अशा गावांची संख्या आपल्या देशात वाढली तर मुलीच्या बापाला आत्महत्या करावी लागणार नाही. मुलीच्या लग्नात हुंडा द्यायला असमर्थ ठरलेल्या मुलीच्या बापाने आत्महत्या केल्याच्या घटना आपल्या देशात मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment