Friday, 30 April 2021

प्रदूषण कमी करणारे यंत्र


लोकसंख्येबरोबरच देशभरात वाहनांची संख्या वाढत आहे. वाहनांचे प्रदूषण कमी  करण्याचे विविध प्रयत्न सुरु आहेत. गारगोटी  येथील  ऋतुराज ज्ञानेश्वर वेदांते या महाविद्यालयीन युवकाने चारचाकी वाहनातील प्रदूषण कमी करणारे यंत्र (सायलेन्सर)  विकसित केले आहे. या यंत्राला सोसायटी ऑफ  ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स स्पर्धेत 'गो ग्रीन'  स्पेशल कॅटेगरीत देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. दरवर्षी सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्सतर्फे  अभियांत्रिकी क्षेत्रातील देशपातळीवर 'बाजा' स्पर्धांचे आयोजन केले जाते. पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ  इंजिनिअरिंगची टीम गेल्या आठ वर्षांपासून स्पर्धेत सहभागी होत आहे. गतवर्षी मध्यप्रदेश येथे झालेल्या स्पर्धेत टीमचा देशपातळीवर चौथा व सस्पेन्शन अँड ट्रॅक्शनमध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत 25 वा क्रमांक मिळविला होता. कोरोनामुळे यावर्षी स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. कॉलेजचे डॉ. के. आर.पाटील व एस.जी.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व ऋतुराज वेदांते, प्रियदर्शी पवार यांच्यासह 25 जणांच्या 'टीम अभेद्य'ने ऑफ रोड व्हेईकल डिझाईज करुन राष्ट्रीय स्पर्धेत सादरीकरण केले. प्रदूषण कसे कमी करता येईल, अशा पद्धतीने वाहनातील यंत्र विकसित केले आहे. स्पर्धेचा निकाल असून 25 एप्रिल रोजी जाहीर झाला. यात देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळविला आहे. शेती आणि व्यक्तिगत पातळीवर कामासाठी या वाहनाचा वापर केला जाऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.


No comments:

Post a Comment