माणूस कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात येईल, सांगता येत नाही. यासाठी काहींना त्यांचं शरीर उपयोगाला येतं. त्यांच्या शरीरामुळे त्यांची एक ओळख निर्माण होते. कोण सर्वाधिक सडपातळ म्हणून जगात नोंदला जातो तर कोण त्याच्या अवाढव्य वजनामुळे जगातील सर्वात वजनदार व्यक्ती म्हणून ओळखली जाते. कोण जगातला सर्वाधिक ठेंगणा तर कोण जगातला सर्वाधिक उंच म्हणून ओळखला जातो. शरीराच्या ठेवणीमुळे काहीजण गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकार्डमध्ये स्थान मिळवत आहेत. अशीच जगातील सर्वात उंच जिवंत व्यक्ती म्हणून तुर्कीच्या सुल्तान कोसेन या माणसाची नोंद गिनिज बुकमध्ये झाली आहे. ही व्यक्ती तब्बल 8 फूट 2.82 इंच उंचीची आहे. 'गिगॅटिझम' आणि 'अॅक्रोमेगली' या विकारामुळे त्याची उंची इतकी भरमसाठ प्रमाणात वाढली. एका ट्यूमरने त्याच्या मस्तिष्कग्रंथीवर परिणाम केल्याने हे सगळे घडले.
मार्दिन या शहरात एका कुर्दिश कुटुंबात 10 डिसेंबर 1982 मध्ये सुल्तानचा जन्म झाला. आता तो जगाच्या इतिहासातील सातव्या क्रमांकाचा सर्वात उंच माणूस ठरला आहे. लहानपणापासूनच त्याची उंची अतिशय जास्त असल्याने त्याला शाळेत जाणेही अवघड जात होते. त्यामुळे त्याचे शिक्षणही अर्धवटच राहिले आहे. घरातले बल्ब लावणे किंवा खिडक्यांना पडदे लावणे, उंच ठिकाणी ठेवलेली वस्तू काढून देणे अशा घरगुती कामांसाठी त्याला त्याच्या उंचीचा उपयोग होत असला तरी अनेक बाबतीत मात्र त्याला त्याची ही उंची त्रासदायकच ठरते. त्याला त्याच्या मापाचे पोशाख खास शिवून घ्यावे लागतात. त्याचे पाय 126 सेंटीमीटर लांबीचे असल्याने बऱ्याच वेळा पँट शिवून घेणे त्याच्यासाठी डोकेदुखीचे असते. त्याचप्रमाणे बूटही खास तयार करवून घ्यावे लागतात. त्याला वाहनात बसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मोठी अडचण येते. कारण त्याला नेहमीच्या वाहनात बसणं अडचणीचं ठरतं. त्यामुळे त्याला बऱ्याचदा पायीच प्रवास करावा लागतो. ऑक्टोबर 2013 मध्ये त्याने सिरियामध्ये जन्मलेल्या मर्ह डिबो हिच्याशी विवाह केला. दोघांच्या वैवाहिक जीवनात उंचीमुळे काही समस्या उद्भवली नसली तरी त्यांच्यासाठी भाषा मात्र अडचणीची ठरली आहे. तो तुर्की भाषा बोलतो तर पत्नीला केवळ अरबी भाषाच बोलता येते! असे असले तरी त्याच्या उंचीने त्याला जगात ओळख निर्माण करून दिली आहे हेही नसे थोडके!-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment