Friday, 23 April 2021

मेडिकल ऑक्सिजन कसे बनते?


सध्याच्या कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. हा प्राणवायू किती महत्त्वाचा आहे हे आता प्रकर्षान माणसाला कळत आहे. हवा आणि हॉस्पिटलमध्ये वापरला जाणारा ऑक्सिजन यामध्ये फरक असतो. मेडिकल ऑक्सिजनमध्ये ९८ टक्के शुद्ध ऑक्सिजन असतो. त्यामध्ये आर्द्रता, धूळ किंवा अन्य वायूंची भेसळ नसते. २०१५ मध्ये देशाच्या अतिआवश्यक औषधांच्या व सामग्रीच्या सूचीत ऑक्सिजनचा समावेश करण्यात आला होता. जागतिक आरोग्य संघटनेनेही गरजेच्या वैद्यकीय सामग्रीत ऑक्सिजनचा समावेश केलेला आहे.

वातावरणातील हवेत केवळ २१ टक्के ऑक्सिजन असतो. त्यामुळे वैद्यकीय आणीबाणीच्या स्थितीत हवेचा वापर कुचकामी ठरतो. त्यासाठी मोठ्या प्रकल्पांमध्ये द्रवरूप शुद्ध ऑक्सिजन तयार करून तो वापरला जातो. मेडिकल ऑक्सिजन तयार करण्यासाठी आधी वातावरणातून ऑक्सिजन वेगळा केला जातो. हवेत ७८ टक्के नायट्रोजन, २१ टक्के ऑक्सिजन आणि एक टक्का भाग हेलियम, नियॉन, क्रिप्टॉन, झेनॉनसारख्या वायूंचा असतो. हवेला अतिशय थंड करून ऑक्सिजन वेगळा काढला जातो. हवेला थंड केल्यावर सर्ववायू एका क्रमाने द्रवरूपात येतात. त्यांना वेगवेगळे करून द्रवरूपातच जमा केले जाते.

अशा प्रकारे ९९.५ टक्क्यांपर्यंत लिक्विड ऑक्सिजन तयार केला जातो. प्रक्रियेच्या आधी हवेला थंड करून तिच्यामधील आर्द्रता आणि फिल्टरच्या माध्यमातून धूळ, तेल व अन्य अशुद्ध घटक बाजूला काढले जातात. उत्पादक असा लिक्विड ऑक्सिजन मोठ्या टँकर्समध्ये स्टोअर करतात. त्यानंतर अतिशय थंड तापमानाच्या क्रायोजेनिक टँकरमधून पुरवठादारांकडे पाठवतात. ऑक्सिजनचा दाब कमी करून त्याला वायूच्या रूपात अनेक प्रकारच्या सिलिंडरमध्ये भरतात. हे सिलिंडर हॉस्पिटलमध्ये पाठवले जातात. काही हॉस्पिटलमध्ये छोटे छोटे ऑक्सिजन जनरेशन प्लांटही असतात.


No comments:

Post a Comment