Friday, 23 April 2021

आठ फूट उंचीची सायकल


माणसाला बऱ्याच भन्नाट कल्पना सुचत असतात. मात्र त्या साकार करण्यात जो यशस्वी होतो, त्याचे कौतुक होते. हेच बघा ना! एका मुलाची त्याच्या वर्गातल्या मुलांपेक्षा उंची अधिक होती. मग त्याला सायकल चालवताना अडचण येऊ लागली. त्याने सायकलची सीट उंच करून आपली सोय करून घेतली. पण त्याची पुढे आणखी उंच वाढत चालल्याने त्याची आणखी अडचण झाली. त्याने विचार केला आणि त्याच्या सायकलची उंचीही वाढवण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याने अशी सायकल बनवली की, ती देशातील सर्वात उंच सायकल ठरली. 

या मुलांचं नाव आहे,राजीव कुमार. तो चंदीगडमध्ये राहतो. देशातील सर्वात उंच फोल्डेबल सायकल म्हणून त्याच्या सायकलीची लिम्का बुकमध्येदेखील नोंद झाली आहे. साहजिकच राजीव कुमार आपल्या या अनोख्या सायकलीमुळे चंदिगडमध्ये लोकप्रिय आहेत. रस्त्यावर जेव्हा सायकल घेऊन फिरतो तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्या सायकल भोवती खिळलेल्या असतात. राजीव जेव्हा दहावीत होता, तेव्हा वर्गात त्यांची उंची सर्वाधिक होती. सायकल चालवायला सोयीस्कर व्हावे म्हणून त्याने पहिल्यांदा आपल्या सायकलची सीट थोडी उंच केली. त्यामुळे सायकल चालवताना त्यांना मजा येऊ लागली. त्यानंतर त्यांची उंची जसजशी वाढत गेली तसतशी त्याच्या सायकलची उंचीही वाढली. 2013 मध्ये त्याने मग स्वतः च त्याच्यासाठी सायकल बनवली. ही सायकल चालवण्याची विशिष्ट पद्धत असून कुणालाही ती जमत नाही. यआ सायकलची लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे,त्यामुळे त्याला आणखीनच हुरूप आला असून त्याला लांबचा प्रवास करून गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये आपले नाव कोरायचे आहे, यासाठी तो खास मेहनत घेत आहे. त्याची भविष्यात चंदिगडहून मुंबईला जाण्याची  योजना आहे. हा प्रवास पूर्ण केला तर सर्वात उंच सायकलवरून सर्वात लांब अंतराचा प्रवास करण्याचा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावावर नोंदवला जाऊ शकतो,याची त्याला आशा आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment