Monday, 24 February 2020

अल्बीनो म्हणजे काय?

प्रत्येक जातीच्या प्राण्याचा स्वतःचा एक वेगळा रंग असतो. वाघाला पट्टे असतात, ससे करडे असतात. गायीवर विविध पिवळसर रंगाच्या छटा आढळतात, तर मानवजातीत काळी, गोरी, पिवळी, तपकिरी, गव्हाळ वर्णाची माणसे आढळतात. एखाद्या समूहामधील सर्वांचा रंग बहुधा जुळणारा व सारखाच असतो. अशा वेळी एकदम वेगळ्याच रंगाचा म्हणजे पूर्ण पांढऱ्या रंगाचा प्राणी आढळला, तर त्याकडे सर्वांचे लक्ष कुतुहलाने वेधले जाते. या श्वेतप्राण्यांना 'अल्बिनो' असे म्हटले जाते. खरे म्हणजे आई वडिलांच्या गुणसूत्रांतून हा गुण बहुतेक वेळा उतरलेला असतो. त्यातही गंमत म्हणजे त्याच आई वडिलांची सर्व भावंडे श्वेत असतात,
असेही नव्हे. गुणसूत्रांच्या जोड्यांची अदलाबदल जशी असेल, तसा हा प्रकार घडतो. कातडीमध्ये मुख्यत: मेलॅनिन हा रंगद्रव्याचा प्रकार असतो. या श्वेताप्राण्यांच्या बाबतीत रंगद्रव्याचा पूर्णतः अभाव असतो. त्याचा एक परिणाम म्हणजे कातडीमधील केशवाहिन्यांतील खेळणाऱ्या रक्ताचा लालिमा व गुलाबी छटा बाह्यत: कानांच्या कडा, हातांचे पंजे, डोळ्यांच्या पापण्या येथे दिसतात. या प्राण्यांच्या बुब्बुळाचा रंगही गुलाबी रंगाकडे झुकणारा असतो.
 भारतातील गाजलेला श्वेतप्राणी म्हणजे रेवाच्या महाराजांकडे असलेला पांढरा वाघ. या वाघाच्या पिल्लांनी जगभरची प्राणीसंग्रहालये आवर्जून भरली गेली आहेत. पांढरा गोबरा ससा दिसायला मोठा छान दिसतो. अंगावर एकही काळा ठिपका नसलेली गुबगुबीत मांजरीही कित्येक घरांतून पाळलेली दिसते. पण मुलत: हे श्वेतप्राणी असतात. रानात वा मोकळ्यावर त्यांना त्यांच्या रंगामुळे आडोसा मिळणे, लपणे कठीण असते. उपजत शहाणपणाने ही मंडळी मानवी सोबतीने कालक्रमणा करू इच्छितात.
 कातडीतील मेलॅनिनचा प्रमुख फायदा म्हणजे सूर्यकिरणांतील अतिनील किरणांपासून मिळणारे संरक्षण. उष्ण कटिबंधातील लोक काळे असतात. याचे कारण त्यांना निसर्गत: या संरक्षणाची आवश्यकता असते. हे संरक्षण या प्राण्यांना नसते. स्वाभाविकच कडक उन्हात जर जास्त वेळ काढावा लागला, तर सूर्याच्या उन्हाने कातडी भाजली जाऊ शकते. यालाच सनबर्न असेही म्हटले जाते. त्यासाठी तीव्र उन्हापासून त्यांना कायमच बचाव करावा लागतो.
सरपटणार्‍या झुरळापासुन विविध प्राण्यांमध्ये हा प्रकार जसा आढळतो, तसाच काही जलचरांतही आज दिसून येतो.('सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून)

No comments:

Post a Comment