व्ही. शांताराम यांच्या 'झनक झनक पायल बाजे' या चित्रपटात एका गाण्यात संध्या यांच्यामागे समूहात नृत्य करणारी एक युवती असा जयश्रीजींचा प्रवास सुरू झाला व पुढे जाऊन जयश्री गडकर नावाचा एक अलौकिक इतिहास आकाराला आला. मेहनत करण्याची तयारी, कोणत्याही प्रकारच्या कष्टात माघार न घेणे व व्यावसायिक निष्ठा या गुणांवर 'जयश्री गडकर' या नावाभोवती 'वलय आणि वळण' आकाराला आले. राजा परांजपे दिग्दर्शित 'गाठ पडली ठका ठका' या चित्रपटात त्यांना सर्वप्रथम महत्त्वाची भूमिका मिळाली.
त्यानंतर त्यांनी सतत पुढेच पावले टाकली. 'आलिया भोगासी' या चित्रपटापासून त्यांची नायिका म्हणून कारकीर्द सुरू झाली. त्यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांच्या नावांत 'सांगत्ये ऐका', 'अवघाची संसार', 'मानिनी', 'रंगपंचमी', 'शाहीर परशुराम', 'बाप माझा ब्रह्मचारी', 'मोहित्यांची मंजुळा', 'सवाल माझा ऐका', 'वैशाख वणवा', 'साधी माणसं', 'पाटलाची सून', 'एक गाव बारा भानगडी', 'जिव्हाळा', 'घरकुल', 'सुगंधी कट्टा' यांचा समावेश होतो, पण अशा केवळ चित्रपटांच्या नावानेच त्यांचे मोठेपण मोजणे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल. तमाशाप्रधान ग्रामीण चित्रपटाची नायिका अशी त्यांची ओळख घट्ट झाली असता त्या शहरी भूमिकेला न्याय देऊ शकणार नाहीत, अशा होणार्या चर्चेला त्यांनी 'मानिनी' चित्रपटातूनच चोख उत्तर दिले. जयश्री गडकर चित्रपटसृष्टीत आल्या तेव्हा अनेकांना वाटत होते की, ही अपर्या नाकाची, साध्या सरळ भांगाची काकू म्हणूनच जमा होणारी पोरगी नायिका म्हणून प्रभाव तो काय पाडणार, पण जयश्री गडकर सुरुवातीपासूनच सहजी हार मानणार्या नव्हत्या. त्यांच्या कलाजीवनाची वाटचाल 'रुपेरी' होती, तितकीच ती 'काटेरी'देखील होती. त्यांना अनंत यातना भोगाव्या लागल्या, पण कामावरच्या निष्ठेमुळे त्या त्यातून सहीसलामत बाहेर पडल्या. दिग्दर्शक अनंत माने यांच्या १९ चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या व त्यांना त्या आपल्या गुरू मानत. त्यांना त्या अण्णा म्हणत. त्यांना नेमके काय हवे हे जयश्रीजींना पटकन समजे. कितीतरी लोकप्रिय गीतांमधून जयश्रीजींच्या नृत्याचा अर्थात नृत्यातून विविधरंगी अभिनयाचा ठसा उमटला आहे. चित्रपट गीत-नृत्यामधील जयश्री गडकर हा एक स्वतंत्र व मोठा अभ्यासाचा विषय आहे. १९७५ साली बाळ धुरी यांच्याशी विवाह केल्यावरदेखील त्यांनी चित्रपटातून भूमिका करणे सुरूच ठेवले. त्यांनी हिंदी चित्रपटांतूनही भूमिका साकारल्या
No comments:
Post a Comment