सुभाष घई हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक आहेत. त्यांनी इ.स. १९८२ साली मुक्ता आर्टस् नावाची चित्रपटनिर्मिती कंपनी स्थापिली. त्यांनी निर्मिलेल्या चित्रपटांतील कर्ज, हीरो, मेरी जंग, राम लखन, सौदागर, खलनायक, परदेस व ताल हे चित्रपट लोकप्रिय ठरले. सौदागर ह्या चित्रपटासाठी त्यांना १९९२ सालचा सर्वोत्तम दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हिंदी चित्रपटातील अनेक गोष्टींतील एक म्हणजे, 'आदमी सोचता कुछ और है और होता कुछ और है.' अर्थात ते घडतानाच एखाद्या व्यक्तिमधील गुणवत्ता कुठे कधी कशी उपयुक्त ठरेल हे काहीच सांगता येत नाही हेदेखील तेवढेच खरे,
सुभाष घई दिग्दर्शक झाला हेदेखील अगदी असेच घडले . ते खरं तर अभिनेता बनायला आला होता. निर्माता-दिग्दर्शक आत्माराम याने आपल्या 'उमंग' चित्रपटात अनेक नवीन चेहर्याना संधी दिली त्यात हादेखील होता. शक्ती सामंता दिग्दर्शित 'आराधना'मधील राजेश खन्नाच्या डबल रोलमधील पायलट भूमिकेतील राजेशचा मित्र सुभाष घईच होता. 'ग्रहण' नावाच्या चित्रपटात तो चक्क नूतनचा नायक होता. अभिनेता म्हणून जम बसत नाही हे लक्षात येताच सुभाष घईने बी. बी. भल्ला याच्यासोबत जोडी जमवत पटकथा लेखन सुरु केला. 'खान दोस्त' वगैरे चित्रपट लिहिताना निर्माता-दिग्दर्शकांशी भेटीगाठी सुरु असतानाच 'गुमनाम', 'पारस' वगैरे चित्रपटाचे निर्माते एन. एन. सिप्पी यांची घईशी भेट झाली. स्टोरी सिटिंगच्या वेळेस घईने आपल्या पटकथेचे विशिष्ट शैलीत वाचन सुरू केले. सिप्पी हे चित्रपट निर्मितीत वाक्बगार व्यक्तिमत्व. ते घईची एकूणच पटकथा सादरीकरणाची पध्दत पाहून इतके व असे प्रभावित झाले की, याच पध्दतीने चित्रीकरण करण्याचे पाऊल टाकण्याचा आत्मविश्वास दाखव असे म्हणतच सुभाष घईला दिग्दर्शनाची संधी दिली. हा चित्रपट होता, 'कालीचरण' (१९७६) वेस्ट इंडिजच्या फलंदाजाचे हे नाव असल्याने या चित्रपटाची प्रसिद्धी काहीशी सोपी झाली. पण आपल्या पहिल्याच चित्रपट दिग्दर्शनात सुभाष घईने मनोरंजनाचा मसाला खच्चून भरला. इथून मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही
No comments:
Post a Comment