म्हैसूरमधील गजबजलेल्या सयाजी राव रस्यावरील या मिठाईच्या दुकानाकडे कोणाचे आवर्जून लक्ष जाईलच असे नाही, पण गुरु स्वीट मार्ट नामक या दुकानामागे अतिशय रोचक इतिहास आहे. फारतर तीनचार गिर्हाईकांना उभे राहण्यासाठी जेमतेम जागा असणार्या या वीतभर दुकानातच मैसूरपाक बनविण्याची कल्पना सुमारे शंभर वर्षांपूर्वी अस्तित्वात आली, आणि या पदाथार्चा जन्म झाला.
मैसूरचे महाराज कृष्णराजा वोडेयार (१८८४-१९४0) हे मोठे खवय्ये होते. निरनिराळ्या उत्तमोत्तम पदार्थांचा आस्वाद घेण्याची आवड त्यांना होती. त्यामुळे त्यांच्या अंबा विलास या महाली भला मोठा मुदपाकखाना ( स्वयंपाकघर ) असे.
कृष्णाराजे हे जातीचे खवय्ये असल्याने त्याच्या मुदपाकखान्यामध्ये अगदी पाश्चात्य पदार्थांपासून ते अगदी पारंपारिक पदार्थांपयर्ंत सर्व काही बनविले जात असे. त्यांच्या महाली असलेल्या देवघरांचा प्रसादही याच मुदपाकखान्यामध्ये तयार होत असे.
महाराज कृष्णराजांना मिठाई अतिशय प्रिय होती. एकदा महाराजांच्या भोजनासाठी सर्व पदार्थ तयार झाले, पण त्यांचे मुख्य खानसामा काकासुर माडप्पा ह्यांनी महाराजांसाठी मिठाई बनविली नाही. भोजनासाठी थोडाच अवधी उरला होता आणि इतक्या कमी वेळामध्ये कुठलाही गोड पदार्थ बनविणे शक्य नव्हते. पण तरीही महाराजांसाठी कोणता ना कोणता गोड पदार्थ बनविणे आवश्यक होते. त्यामुळे माडाप्पाने एक नवीनच प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. चण्याच्या डाळीचे पीठ, तूप आणि साखर एकत्र करून त्यांनी पाक (मिर्शण) तयार केला. हा मऊ पाक थाळीमध्ये घालून, त्याच्या वड्या कापून, ह्या वड्या कृष्णराजांसमोर त्यादिवशीची मिठाई म्हणून पेश केल्या गेल्या. कृष्णराजांना ह्या वड्या इतक्या आवडल्या, की त्यांनी ह्या वड्या पुन्हा पुन्हा मागून घेऊन खाल्ल्या.
इतकी लाजवाब मिठाई खाऊन तृप्त झालेल्या महाराजांनी जेव्हा आपल्या खानसाम्याला ह्या मिठाईचे नाव विचारले, तेव्हा खानसाम्याने एका क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले, मैसूर पाक ! अश्या रीतीने त्या दिवशी या पक्वान्नाचा जन्म झाला. मैसूर पाक आजच्या काळामध्ये अनेक शहरांमधील मिठायांच्या दुकानामध्ये हा पदार्थ मिळत असला, तरी मैसूर येथील गुरु स्वीट मार्ट माडाप्पाच्या वंशजांचे असून, केवळ येथेच मूळ पाककृतीनुसार बनविला गेलेला मैसूर पाक चाखण्यास मिळतो.
No comments:
Post a Comment