Thursday, 30 January 2020

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या:विद्या बाळ

नारी समता मंच, मिळून सार्‍या जणी, अक्षरस्पर्श ग्रंथालय, साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ, पुरुष उवाच अभ्यासवर्ग, पुरुष संवाद केंद्र सारख्या पुण्यात स्थापन झालेल्या संस्था तसेच केंद्रे ज्यांच्या मार्गदर्शनात झाल्या ते व्यक्तिमत्त्व म्हणजे विद्या बाळ होय. यासह त्यांना आगरकर पत्रकारिता पुरस्कार, कै. कमल प्रभाकर पाध्ये ट्रस्टचा पुरस्कार, कै. शंकरराव किलरेस्कर पुरस्कार, सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे देण्यात येणारा सामाजिक कृतज्ञता जीवनगौरव पुरस्कार, स्त्री-समस्यांविषयक कार्य व पत्रकारिता याबद्दल फाय फाऊंडेशनचा पुरस्कारही मिळालेला आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि संपादक विद्या बाळ यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. उपचारादरम्यान त्यांनी पुण्यातील खासगी रुग्णालयात गुरुवार, ३0 जानेवारी रोजी सकाळी अखेरचा श्‍वास घेतला. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक आंदोलनांमध्ये विद्याताई सक्रीय होत्या. लेखिका आणि संपादक म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. विद्याताईंचे मिळून सार्‍याजणी हे मासिक अत्यंत गाजले. विद्या बाळ यांना स्त्रियांच्या समस्यांबाबत विशेष आस्था होती. १९८१ मध्ये त्यांनी नारी समता मंच या संस्थेची स्थापना केली. ग्रामीण स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत करणार्‍या ग्रोइंग टुगेदर या प्रकल्पाच्या प्रकल्प-प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. विद्या बाळ यांनी दोन अनुवादित आणि एक रुपांतरित कादंबरी लिहिली आहे. १९८२ मध्ये दोन स्त्रियांचे खून झाले. त्यावेळी विद्या बाळ यांच्या नारी समता मंच या संघटनेने गावोगावी जाऊन वाहत्या रस्त्यांवर मी एक मंजुश्री नावाचे प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनाने अख्खा महाराष्ट्रच ढवळून निघाला. स्त्रियांना बोलण्यासाठी काही जागा हवी. म्हणून मग विद्या बाळ यांच्या संघटनेने बोलते व्हा नावाचे केंद्र सुरू केले. पुरुषांनाही याची गरज होती. त्यातून २00८ मध्ये पुरुष संवाद केंद्र सुरू केले. विद्या बाळ यांचा जन्म १२ जानेवारी १९३७ रोजी झाला. त्यांनी १९५८ मध्ये पुण्यातील फग्यरुसन कॉलेजमधून बी. ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली. महाराष्ट्रातील आणि भारतातील स्त्रियांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. विद्या बाळ यांनी पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून दोन वर्षे काम केले. त्यानंतर, १९६४ ते १९८३ या काळात स्त्री मासिकाच्या त्या सहाय्यक-संपादक झाल्या आणि १९८३ ते १९८६ या काळात मुख्य संपादक. त्यानंतर त्यांनी ऑगस्ट १९८९ मध्ये मिळून सार्‍याजणी हे मासिक सुरू केले.

No comments:

Post a Comment