Monday, 2 March 2020

चित्ता आयात करून संवर्धन केले जाणार


भक्ष्य म्हणून निवडलेल्या प्राण्याचा प्रचंड वेगाने पाठलाग करणारा, कमनीय बांध्याचा चित्ता आपल्या परिचयाचा आहे. त्याचे शरीर म्हणजे एक अचूकपणे पळणारे यंत्रच! त्याच्या नष्ट होत चाललेल्या अधिवासामुळे विसाव्या शतकातच तो भारतातून नामशेष झाला. सध्या तो आफ्रिका, नामिबिया वगैरे ठिकाणी सापडतो. पिवळ्या रंगाच्या शरीरावर काळे भरीव ठिपके आणि डोळ्यांच्या आतील कोपऱ्यातून खालपर्यंत येणारा काळा ओघळ ही त्याची ओळख. वेगासाठी बनलेले अवघे शरीरच जणू.. चित्ता जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे. तो साधारणत: ताशी ११५-१२० किमी या वेगाने पळू शकतो. त्याच्या शरीररचनेबरोबरच त्याचे अवयवदेखील वेगासाठीच अनुकूल असतात.
वेगाने धावताना त्याची चपटी शेपटी ‘रडार’सारखे काम करते. त्याची फुप्फुसे, यकृत, हृदय हे अवयव आकारमानाने मोठे असतात. विशेषत: श्वसनसंस्था वेगासाठी सज्ज असते, ज्यायोगे वेगाने धावताना जास्त प्राणवायूचा पुरवठा होतो. त्याच्या पाठीचा कणा लांब आणि लवचीक असतो; त्यामुळे एका झेपेत तो मोठे अंतर पार करू शकतो. पळताना त्याचे डोके स्थिर आणि नजर केवळ भक्ष्यावर केंद्रित असते. वायुगतिशास्त्रीय (एरोडायनॅमिक) शरीर, वजनाने हलका सांगाडा, लांब-सडपातळ पाय, थोडेसे आत ओढून घेता येणारे पंजे, वेधक नजर, कमी लांब असलेले सुळे, लांब, स्प्रिंगप्रमाणे असलेली अस्थिबंधन, छोटे डोके, गोलसर कान.. जणू निसर्गाने छिन्नी चालवून वेगासाठी तयार केलेले शरीरच!
वेगाने पळणाऱ्या चित्त्याचे चारही पाय जास्त काळ जणू हवेतच असतात. त्याचे पंजे वेगाने पळताना जमिनीला अगदी कमी स्पर्श करतात आणि त्याच्या वक्र नखांमुळे कर्षण वाढण्यास मदत होते. त्याच्या शरीरात ‘फास्ट ट्विच’ या प्रकारचे स्नायू खूप जास्त असतात. ते स्नायू काही मिनिटेच कार्यरत राहू शकतात, त्यामुळे त्याचा प्रचंड वेग साधारणत: १६००-१८०० फुटांहून जास्त अंतरानंतर टिकू शकत नाही. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत चित्त्याच्या शरीराचा प्रत्येक भाग वेगासाठी अनुकूल झाला आहे. चित्ता म्हणजे उत्क्रांतीचे एक सुंदर उदाहरण म्हणावे लागेल.
चित्ता हा प्राणी भारतातून नामशेष झाला होता. हा प्राणी आता परत भारतात आणून जंगलात सोडण्याचे प्रयत्न होत आहेत. मध्य प्रदेशातील जंगलात चित्ता सोडण्यात येणार आहे. आशियाई चित्ता आता फक्त इराणमध्ये, तोही अत्यंत कमी संख्येत आहे; म्हणून आता आफ्रिकी चित्ता भारतात आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यांच्या सुरक्षित अधिवासासाठी संवेदनशील राहणे ही आपली जबाबदारी आहे.
  तो सडपातळ व चपळ असतो. डोक्यापासून शेपटीच्या टोकापर्यंत चित्त्याची लांबी २-२.५ मी. असते. यात ०.६-०.७५ मी. लांबीचे शेपूट समाविष्ट असते. वेगाने पळताना क्षणात दिशा बदलण्यासाठी त्याला शेपटीचा उपयोग होतो. खांद्यापाशी त्याची उंची ६७—९४ सेंमी. भरते. छाती रुंद, तर कंबर बारीक असते. प्रौढ चित्त्याचे वजन ३५—६५ किग्रॅ. इतके भरते. डोके लहान व वाटोळे असून कानही लहानच असतात. डोळ्यांच्या बाहुल्या वर्तुळाकार असतात. नाकाच्या दोन्ही बाजूंना डोळ्यांपासून ओठाच्या कोपऱ्यांपर्यंत गेलेले दोन काळे पट्टे असतात. या पट्ट्यांना त्यांचे अश्रुमार्ग म्हणतात. त्वचा खडबडीत व रंगाने पिवळी असते. अंगावर वर्तुळाकार आणि आकाराने लहान असे भरीव काळे ठिपके असतात. पोटाकडील भाग फिकट असतो. पाय लांब असतात. पायांच्या नख्या अंशत: प्रतिकर्षी असल्याने बोथट असतात. नख्या काहीशा वाकड्या असतात; परंतु भक्ष्याचा पाठलाग करताना आपली दिशा बदलण्यासाठी या उघड्या नख्यांचा चित्त्याला अतिशय उपयोग होतो.
चित्त्याचे मुख्य भक्ष्य म्हणजे लहान हरणे. पक्षी, ससे किंवा इतर सस्तन प्राणी यांचीही तो शिकार करतो. प्रामुख्याने, दिवसाउजेडीच पण गरजेनुसार चांदण्या रात्रीही चित्ता शिकार करतो. शिकार करताना प्रथम चित्ता दबकत दबकत गवताच्या व झुडपांच्या आडोशाने भक्ष्याच्या जवळ जातो आणि भक्ष्य टप्प्यात आले म्हणजे त्याचा पाठलाग सुरू करतो. भक्ष्याचा पाठलाग करताना त्याचा वेग ताशी ८०—११० किमी. असतो. मात्र, दीर्घकाळ त्याला या वेगाने पळता येत नाही. या वेगाने तो सु. ३५० मी. एवढेच अंतर धावू शकतो. या धावेत भक्ष्य हाती लागले नाही, तर तो त्याचा नाद सोडून देतो. चित्ता हा सर्वाधिक वेगाने धावणारा सस्तन प्राणी आहे.
चित्त्यामध्ये नर मादीपेक्षा मोठा असतो. नर व मादी समागमासाठी एकत्र येतात. गर्भावधिकाल ८४—९० दिवसांचा असतो. मादीला एकावेळी २—४ पिले होतात. स्वतंत्रपणे राहण्यास सक्षम होईपर्यंत पिले आईबरोबर राहतात. चित्त्याचे आयुर्मान १०—१२ वर्षे असते. मात्र, सुरक्षित अवस्थेत तो सु.२० वर्षे जगू शकतो.
चित्ता व बिबट्या यांच्यामध्ये पुष्कळदा गल्लत केली जाते. परंतु त्या दोघांमध्ये ठळक फरक आहेत. चित्ता बिबट्यापेक्षा सडपातळ असतो. चित्त्याच्या अंगावर भरीव आणि छोटे काळे ठिपके असतात, बिबट्यांचे ठिपके पुंजक्या-पुंजक्यात असून ते पोकळ असतात. चित्ता बहुदा दिवसा शिकार करतो, बिबट्या रात्री शिकार करतो. चित्ता झाडावर चढत नाही, बिबट्या आपली शिकारसुद्धा झाडावर घेऊन जाऊ शकतो. चित्त्याला आपल्या नख्या पंजात ओढून घेता येत नसल्यामुळे त्या बोथट असतात. मात्र, बिबट्याच्या नख्या तीक्ष्ण व बाकदार असतात.
चित्त्याचे कातडे हौशी लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. यामुळेच त्यांची फार मोठ्या प्रमाणावर तारतम्यहीन शिकार झाली. भारतात चित्ता १९४० सालापासून नामशेष झाल्याचे दिसून आले आहे. भारतात पुन्हा एकदा चित्ता आयात करून व त्याला संरक्षण देऊन त्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

No comments:

Post a Comment