Sunday, 22 March 2020

देशभक्तीने झपाटलेले शहीद हेमू कालानी

माझ्या मनात अजूनही सिंध घुमतो आहे. जिथल्या हेमू नामक २0 वर्षीय युवकाला मार्शल कोर्टाने रेल्वे रूळ उखाडण्याच्या गुन्ह्याखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. मला असे वाटते की, त्याच्या या देशभक्तीने प्रेरित कामगिरी येणार्‍या भारतीय पिढीवर फार मोठा प्रभाव पडेल. हेमू आणि अन्य शहिदांच्या देशप्रेमाची इतिहास आठवण ठेवेल! हे बोल आहेत स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आणि ज्या महान देशभक्तासाठी २६ जानेवारी १९४३ रोजी हे उच्चारल्या गेले होते, त्याचे नाव आहे वीर शहीद हेमू कालानी.

२३ मार्च १९२३ रोजी सिंधच्या सक्खर येथे पिता पेसूमल आणि माता जेठीबाई या सिंधी दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या शहीद हेमू कालानी यांची आज जयंती. त्याप्रीत्यर्थ त्यांना अभिवादन म्हणून गुंफलेले हे स्मरण पुष्प. अगदी लहान वयातच स्वातंत्र्य प्रेमाने झपाटलेल्या हेमूच्या हाती युवकांचे नेतृत्व करतांना अनेकदा तिरंगा असायचा. त्यांच्यावर स्वतंत्रता संग्राम सेनानी डॉ. मंघाराम कालानी यांचा विशेष प्रभाव होता.१९४२ मध्ये महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने हेमू फार प्रभावित झाले. आपणही देशासाठी काही करू शकतो, असा निर्धार मनाशी केला असतांनाच हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी शस्त्रे भरून रोहडी ते क्वेटा अशी जाणारी रेल्वे उलथवून टाकण्याची त्यांनी योजना आखली. या कामी अन्य दोन सहकाखयांचे योगदान त्यास लाभले. रेल्वे रूळाला असलेल्या फिश प्लेट काढण्यास सुरुवात झाली नाही तोच याचा सुगावा ब्रिटिश पोलिसांना लागला आणि हेमू त्यांच्या तावडीत सापडले. अन्य दोन सहकारी मात्र फरार होण्यात यशस्वी झाले. त्यांच्या नावाहून स्वातंत्र्यानंतर सुध्दा अनेक वाद झाले. त्यामुळे ते सहकारी नेमके कोण होते, हे सांगता आले नाही. काही ठिकाणी त्यांची नावे नंदू आणि ईसर अशी असल्याचे म्हटले आहे.
ब्रिटिशांनी सहकार्‍यांची नावे सांगावी म्हणून हेमूवर अनगिणत अत्याचार केले. परंतु, हेमूच्या तोंडातून भारत माता की जय शिवाय अन्य काहीच निघाले नाही. परिणामी सक्खर जिल्हा मार्शल लॉ कोर्टाने हेमूला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. याची पुष्टी करण्यास कर्नल रिचर्डसन याला पाठविण्यात आले. परंतु,रिचर्डसनने कारावासाच्या शिक्षेला मृत्यू दंडाच्या शिक्षेत बदलविले. त्यांच्या कुटुंबीयांकडून व काही प्रतिष्ठित नागरिकांच्या माध्यमातून दया याचिका दाखल करण्यात आली. परंतु, त्याचा काही एक परिणाम ब्रिटिशांवर झाला नाही. ब्रिटिशांनी फरार सहकार्‍यांची नावे सांगण्याची अट घातली. साहजिकच हेमूने त्यांची ही अट धुडकावली. अखेर हेमू कालानी या भारतीय वीर पुत्रास २१ जानेवारी १९४३ रोजी फाशी देण्यात आली. याच वर्षी त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली होती. फाशी पूर्व हेमूला अंतिम इच्छा विचारल्या गेली असता, याच भारत वर्षात परत जन्म घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. इंकलाब जिंदाबाद आणि भारत माता की जय म्हणत हेमू देशासाठी हसत हसत फासावर गेला आणि भारतीय सुवर्ण इतिहासात सदा करिता अमर झाला. फासावर जाण्यापूर्वी भाऊ टेकचंद यास जवळ घेऊन स्वातंत्र्य लढय़ात सहभाग घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रेरित केले. १९४५ मध्ये सिंध यात्रा दरम्यान पंडित नेहरूंनी हेमू यांच्या घरी जाऊन त्यांना र्शद्धांजली वाहिली. तर, आझाद हिंद फौजेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सुवर्ण पदक देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या पुण्यतिथी निमित्त २१ जानेवारीला शासकीय सुटी जाहीर केली आहे तर २१ जानेवारी २00३ रोजी भारतीय संसदेत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते हेमू यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. १८ ऑक्टोबर १९८३ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हेमू कालानी या देशभक्तावर त्यांच्या स्मरणार्थ आई जेठीबाई यांच्या उपस्थितीत टपाल तिकिटाचे लोकार्पण केले. देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात प्राणाची आहुती देणारे वीर हेमू कालानी यांची आज जयंती त्याप्रीत्यर्थ त्यांना सार्शू नयनांनी अभिवादन.

No comments:

Post a Comment