Saturday, 28 March 2020

पर्वतप्राय लाटा म्हणजे काय ?

पर्वतप्राय लाटा म्हणजे पर्वताएवढ्या उंचीच्या महासागराच्या लाटा . अशा लाटा महाप्रचंड उंच उसळतात , समुद्रकिनारपट्टीलगतच्या प्रदेशाचा विध्वंस करतात , महासागरगामी बोटींचा नाश करतात , महासागरी प्राणिजीवनाला विस्कळित करतात . महासागराच्या तळाशी मोठे भूकंप होतात . त्यांच्यामुळे पर्वतप्राय लाटा उसळतात . ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे अशाच लाटा उठतात . डच इस्ट इंडीजमधील क्राकातोआ बेटावर २७ ऑगस्ट १८८३ रोजी ज्वालामुखीचा महाप्रचंड स्फोट झाला .
त्याच्या परिणामी शंभर फुटांपेक्षा जास्त उंचीच्या महासागरी लाटा उसळल्या . त्यांनी शंभर खेडी भुईसपाट केली . त्यांचा ताशी वेग ७०० मैल होता . एवढ्या महाप्रचंड वेगाने त्या किनारपट्टीवर धावत जात होत्या . त्यामुळे त्या बेटापासून हजारो मैल दूर असलेल्या ऑस्ट्रलिया व कॅलिफोर्निया येथे त्यांचा परिणाम जाणवला .
१९४६ साली हवाई बेटांना अशाच पर्वतप्राय लाटांचा तडाखा बसला . अवघ्या पाच तासांत दोन हजार मैल अंतर कापून त्या लाटा हवाई बेटांवर आपटल्या , महासागराच्या तळाशी झालेल्या भूकंपाचा तो परिणाम होता . सुमारे १७० माणसे बुडून मेली .
या पर्वतप्राय लाटांना जपानी भाषेत ' त्सुनामी ' म्हणतात . १९९४ सालाच्या ऑगस्ट महिन्यात चीनच्या एका प्रांतात पर्वतप्राय लाटांनी प्रचंड विध्वंस केला . चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या या लाटांनी सुमारे ७०० लोकांचे बळी घेतले व शेकडो घरे जमीनदोस्त केली .

No comments:

Post a Comment