सौंदर्य आणि गुणवत्तेचा मिलाप हा शारापोव्हाकडे होता. टेनिस कोर्टवरील तिचा वावरसुद्धा तितकाच लक्षवेधी होता. वयाच्या १७ व्या वर्षी विम्बल्डनच्या हिरवळीवर ग्रँडस्लॅम जेतेपद आणि मग वर्षभरातच जागतिक टेनिस क्रमवारीतील अग्रस्थान काबीज केल्यानंतर मारिया शारापोव्हाने टेनिसजगताच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु गुणवत्ता असूनही १७ वर्षांच्याटेनिस कारकीर्दीत तिला अवघ्या पाच ग्रॅँडस्लॅम विजेतेपदांवर समाधान मानावे लागले. दुखापतीमुळे या टेनिससम्राज्ञीची कारकीर्द शापित राहिली.. त्यामुळेच गेल्या काही वर्षांतील खेळ पाहता तिची निवृत्ती धक्कादायक मुळीच नव्हती.
सौंदर्य आणि गुणवत्तेचा मिलाप हा शारापोव्हाकडे होता. टेनिस कोर्टवरील तिचा वावरसुद्धा तितकाच लक्षवेधी होता. शारापोव्हाची कहाणीसुद्धा तितकीच रोचक आहे. रशियातील एक लहानशी मुलगी आपल्या वडिलांबरोबर अमेरिकेला जाते आणि आईशिवाय दोन वर्षे राहते. मग वडिलांसोबत टेनिसचे धडे गिरवते. वडीलदेखील वेळप्रसंगी भांडी घासण्यासारखी कमी दर्जाची कामे करून त्या मुलीचा टेनिस शिक्षणाचा खर्च भागवतात. त्यामुळेच तर एक गुणी टेनिसपटू घडू शकली.
लहान वयात आईवडिलांनी टेनिसपटू म्हणून घडवण्यासाठी केलेला संघर्षच शारापोव्हाला टेनिसमध्ये वयाच्या १७व्या वर्षी विम्बल्डन जिंकण्याची उमेद देतो. २००४ मध्ये वयाच्या १७व्या वर्षी विम्बल्डन जिंकून शारापोव्हाने संपूर्ण टेनिस जगताला तिच्या गुणवत्तेप्रमाणेच सौंदर्याने घायाळ केले. अर्थातच महिलांचे टेनिस हे खेळासाठी गाजतेच, पण तितकेच सौंदर्यवती महिला टेनिसपटूंनीही त्याला संपन्न केले आहे. स्टेफी ग्राफ, मार्टिना हिंगीस यांच्यासारख्यांनी टेनिस कोर्टावर वर्चस्व गाजवले. त्यांच्या पंक्तीत रशियाच्या मारिया शारापोव्हाचा समावेश केला जातो. मात्र दुर्दैवाने गुणवत्ता असूनही शारापोव्हाला स्टेफी ग्राफप्रमाणे कारकीर्द उंचावता आली नाही.
२००५, २००७, २००८, २०१२ या चार वर्षांच्या अखेरीस शारापोव्हा महिला एकेरीत अग्रस्थानावर होती. संपूर्ण कारकीर्दीत तिने पाच ग्रॅँडस्लॅम जेतेपदे जिंकली. मात्र गुणवत्ता असूनही खांद्याच्या दुखापतीमुळे तिच्या कारकीर्दीचे नुकसान झाले. वयाच्या विशीमध्येच खांद्याच्या दुखापतीने उचल खाल्ली आणि आता निवृत्ती घेईपर्यंत या दुखापतीने तिचा पिच्छा पुरवला. ‘टेनिसला माझा अलविदा,’ अशा शब्दांत शारापोव्हाने ‘व्होग’ आणि ‘व्हॅनिटी फेअर’ या मासिकांद्वारे निवृत्ती जाहीर केली.
शारापोव्हाच्या कारकीर्दीत एक मोठा काळा डाग लागला, तो २०१६च्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे. तिच्यावर १५ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. अर्थातच त्यातून तिने पुनरागमन केले. २०१८मध्ये तिने टेनिस क्रमवारीतील अव्वल २५ जणींमध्ये पुन्हा स्थान मिळवले आणि फ्रेंच खुल्या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. पण कारकीर्दीच्या सुरुवातीला ज्या पद्धतीने तिने यशाचा आलेख उंचावला होता, तितकी मजल तिला मारता येत नव्हती. अनेक ग्रॅँडस्लॅम आणि अन्य स्पर्धामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या फेरीच्या पुढे तिला मजल गाठता येत नव्हती. परिणामी तिचे स्थान ३७३पर्यंत घसरले. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅँडस्लॅममध्येही शारापोव्हाला सलामीलाच गारद व्हावे लागले होते. तिची कामगिरी पाहता ती जास्त काळ व्यावसायिक टेनिस खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झाले होते. अखेर निवृत्ती घोषित करण्याचा तिचा दिवस उजाडला.
शारापोव्हाने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. ‘अनस्टॉपेबल-माय लाइफ सो फार’ या तिच्या आत्मचरित्रात तिने हे सारे मांडले आहे. दुखापतींचा फटका बसल्याने टेनिस कारकीर्दीवर परिणाम झाला असला तरी सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये शारापोव्हा सलग १० वर्षे अव्वल होती. सौंदर्यामुळे अनेक नामवंत कंपन्यांनी तिला जाहिरातीसाठी करारबद्ध केले होते. त्यामुळे आजही सर्वात श्रीमंत महिला टेनिसपटू म्हणून शारापोव्हा प्रसिद्ध आहे. याचप्रमाणे विविध मित्रांसोबतच्या प्रेमप्रकरणांनीसुद्धा ती सदैव चर्चेत राहिली. सामन्यांदरम्यानही प्रेक्षागृहातून अनेक चाहत्यांकडून तिला लग्नाची जाहीर मागणी घालण्यात आली होती.
अशी ही ३२ वर्षीय शारापोव्हा आता टेनिस मैदानावर दिसणार नाही. पण भविष्यात ही टेनिससम्राज्ञी जिथे जाईल तिथे चाहत्यांची गर्दी जमा होईल यात शंका नाही. कारण गरिबीवर मात करून शारापोव्हाने केलेला टेनिसचा प्रवास हा थक्क करणारा आहे.
No comments:
Post a Comment