जगभरात सोन्याचा जो साठा आहे, त्यातील 20 टक्के भारतीयांकडे आहे.अमेरिकेतील आयबीएम तसेच मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीच्या स्टाफमध्ये 28 ते 34 टक्के भारतीय आहेत.तसेच अमेरिकन स्पेस एजन्सी नासामधील तीन कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी भारतीय आहे.अमेरिकेत प्रॅक्टीस करणारे 100 पैकी 38 डॉक्टर आपले भारतीयच आहेत. तसेच विश्वाची निर्मिती कशी झाली या विषयीचा बिग बॅंग संशोधन प्रकल्पात भारतीय शास्त्रज्ञ आहेत व्वा!
पण आता पुढील आकडेवारीवरही एक नजर टाकूया.आज आपल्या देशामध्ये दररोज 40 हजारहुन अधिक लोकांना क्षयरोगाचा संसर्ग होतो.यापैकी पाच हजारांहून अधिक लोकांनी क्षयाची लागण होते. या पैकी एक हजाराहून अधिक रूग्ण क्षयरोगाने मरण पावतात.म्हणजेच दर दीड मिनिटाला एक रूग्ण क्षयरोगाने मरण पावतो.
त्याचप्रमाणे आपल्या देशात दरवर्षी अठरा लाखाहून अधिक नवीन क्षयरूग्ण आढळून येतात. त्यातील आठ लाख रूग्ण हे थुंकीदूषीत असून ते इतरांना हा रोग देण्यास सक्षम आहेत. जागतिक आरोग्य संस्थेच्या अंदाजानुसार सन 2020 मध्ये जगातील अंदाजे एक अब्ज क्षयरोगाने त्रस्त असतील. क्षयरोगाची आकडेवारी ही दिवसेंदिवस वाढत आहे. शासनस्तरावर सन 1992 मध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यामध्ये झाली व सन 2005 सालापर्यंत हा कार्यक्रम संपूर्ण देशात राबविण्याचा संकल्प सोडण्यात आला.व आज पूर्ण भारतात हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक 24 मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग,लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग,आतड्यांचा क्षयरोग इत्यादी.
सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डॉटस् म्हणजे डायरेक्टली ऑब्जर्व्ह ट्रीटमेंट वूईथ शॉर्टटर्म केमोथेरपी नावाचा औषधोपचार क्षयरोगावर केला जातो.सहा महिने व आठ महिने असा हा उपचाराचा कालावधी असून नवीन क्षयरोग्यांनी सुरूवातीचे सहा महिने डॉटस्ची औषधी व्यवस्थीत घेऊन त्याची तपासणी दिलेल्या वेळेत केल्यास हा आजार 100 टक्के पूर्ण बरा होतो. सध्या खात्रीशीर उपचार म्हणून या डॉटस् उपचार प्रणालीकडे पाहिले जाते.ही उपचार पध्दती सरकारी दवाखान्यातून मोफत दिली जाते.क्षयरूग्णाला डॉटस् उपचार सुरू झाल्यास रूग्णाच्या गावातच त्याला आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी वर्कर अशा वर्कर यांच्या मार्फत डॉटस् दिला जातो.
क्षयरोगाची अनेक रूग्ण, क्षयरोगाविरोधाी औषधी योग्य डोसमध्ये व योग्य कालावधीपर्यंत घेत नाहीत.या अर्धवट उपचारापुढे तसेच क्षयरोग जंतूमध्ये होणाऱ्या उत्परिवर्तामुळे क्षयरोगाविरोधी औषधी पचविण्याची किंवा त्यांना दाद न देण्याची क्षमता या जंतूमध्ये निर्माण होते. ज्या प्रमाणे डास आता डीडीटी या औषधाला दाद देत नाहीत.तद्वतच क्षयरोग जंतू या क्षयरोगविरोधी बहुविध औषधाला प्रतिसाद देत नाहीत.अशा औषधरोधक जंतूमुळे होणाऱ्या रोगास मल्टिपल ड्रग रेझिस्टन्ट टी.बी.असे म्हणतात. एमडीआर टीबी उपचार पध्दती ही साधारण 24 ते 27 महिने असून ही उपचार पध्दती खूपच खर्चीक आहे.याचा उपचार लाखोंच्या घरात असून यासाठी लागणारा खर्च शासन करीत आहे. परंतु क्षयरोग्याने सुरूवातीलाच पूर्ण उपचार (6 ते 8 महिने कोर्स) घेतल्यास ही वेळ येणार नाही.
आज देशात क्षयरोग व एडस् ही दोन आजार आपल्यासमोर आव्हानात्मक उभी आहेत. एचआयव्ही/एडस् ची बाधा झालेल्या व्यक्ती पैकी 60 टक्के लोकांना क्षयरोगाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. क्षयरोग हा एचआयव्ही बाधीत व्यक्तीमधील सर्वात जास्त प्रमाणात आढळून येणारा संधी साधू आजार आहे. एचआयव्हीच्या विषाणूंनी आपल्या शरीरात प्रवेश मिळविल्यानंतर ते आपले रोग प्रतिकार शक्तीच नष्ट करून टाकतात.परिणामी क्षयरोग सहजपणे होतो.याला आळा घालण्यासाठी डॉटस् उपचार पध्दतीचा अवलंब केला गेला पाहिजे. डॉटस् पध्दतीमुळे एचआयव्ही संसर्गीय रूग्णांच्या आयुष्याची फक्त गुणवत्ताच नव्हे तर आयुष्याची मर्यादा सुध्दा वाढू शकते हे आता सर्वज्ञात झाले आहे.
आज आपण सर्वांनी क्षयरोगाबाबत जाणीव जागृती करून समाजाप्रती उत्तराई होऊ या! या प्रसंगी एकच करूया निर्धार,आयुष्यात नकोच क्षयाचा आजार या घोषवाक्याने याची सुरूवात करूया !
No comments:
Post a Comment