प्रतिवर्षी २२ मार्च हा संयुक्त राष्ट्रांतर्फे ‘जागतिक जल दिन’ म्हणून साजरा केला जातो. २२ मार्च १९९३ रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आला. स्वच्छ व ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची योग्य काळजी घेणे आणि त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे, या मुख्य उद्देशाने हा दिवस सुरू करण्यात आला. पाण्याच्या अनेक स्रोतांपैकी केवळ स्वच्छ व ताज्या पाण्याच्या (फ्रेश वॉटर; ‘गोडे पाणी’ नव्हे!) संदर्भातच हा दिन साजरा केला जातो, हे महत्त्वाचे आहे.
पृथ्वीवरील एकूण पाणीसाठय़ापैकी २.५-२.८ टक्के जलस्रोत हे खारे नसलेल्या पाण्याचे, बहुतांश पेयजल म्हणता येईल असे आहेत. यातील २.२-२.५ टक्के पाणी हे विषम पाणीवाटप, जलप्रदूषण अशा कारणांमुळे अनुपलब्ध असते; यामुळे केवळ ०.३ टक्के पाणी हे सजीव सृष्टीसाठी पेयजल म्हणून वापरात येते. त्यात, स्वत:ची गरज ओळखून आणि विवेकी वापराऐवजी अविचारी, अयोग्य पाणीवापर वाढत गेला. परिणामी जागतिक जल दिनाच्या माध्यमातून पाण्याच्या विवेकी वापराविषयी मोठय़ा प्रमाणावर जनजागृती करणे अत्यावश्यक ठरले.
संयुक्त राष्ट्रांच्या जलविकास आराखडय़ाशी सुसंगत असे दर वर्षी हा दिन साजरा करण्याचे संकल्पनासूत्र ठरते. यंदाच्या जल दिनाचे संकल्पनासूत्र आहे- ‘पाणी आणि हवामानबदल’! या दोन्ही गोष्टींची असलेली अविभाज्य, घट्ट वीण कालातीत आहे.
जागतिक तापमानवाढीमुळे जलस्रोतांवर विपरीत परिणाम होतो आहे, हे वास्तव आहे. जलप्रदूषण आणि पावसाची अनियमितता यांमुळे पाणीप्रश्न अधिक जटिल होत चालला आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून हे आपण अधिक तीव्रतेने अनुभवत आहोत. शिवाय जागतिक लोकसंख्येत होत असलेली वाढ पाहता, पाण्याची मागणी वाढतीच राहणार आहे. त्यामुळे पाण्याचा जपून आणि गरजेपुरताच वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. मुख्य म्हणजे, पाण्याच्या सुयोग्य आणि आवश्यक तितक्याच वापरामुळे हरितगृह वायूंच्या निरंतर वाढीलाही काही प्रमाणात अटकाव होईल.
जगाने आजवर दोन महायुद्धे अनुभवली आहेत; तिसरे महायुद्ध पुरेसे पाणी मिळवण्यासाठी होईल, असे भाकीत केले गेले आहे. ते टाळायचे तर प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखून पाण्याचा वापर करायला हवा आणि जलस्रोतांचे संवर्धन करण्यात हातभार लावला पाहिजे.
No comments:
Post a Comment