Tuesday, 24 March 2020

फळांचा राजा आंबा

आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून जागतिक स्तरावर भारत हा प्रमुख आंबा उत्पादक देश आहे. उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र इत्यादी प्रमुख आंबा उत्पादक राज्ये आहेत. महाराष्ट्रातील कोकणात हापूस आंबा हे पारंपारिक फळ असून स्वाद, रंग, चव, टिकाऊपणा यामुळे निर्यातीसाठी मोठी मागणी आहे. महाराष्ट्रातील हापूस व केशर या पारंपारिक जाती आहेत. याशिवाय दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना, सिंधू, कोकण रुची, कोकण राजा, सुवर्णा, सम्राट यासारख्या संकरित आंबा जातींची निर्मिती करून कोकणासह महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये लागवडीसाठी प्रसारित केल्या. निर्यातीसाठी आवश्यक असलेली फळे मिळवण्यासाठी विद्यापीठाने क्ष किरण प्रतिमांकन यंत्र (x- ray imagination technique) विकसित केले असून या यंत्राच्या साहाय्याने इतर कारणांनी बाधित फळे वेगळी करता येतात. मात्र अद्याप हे यंत्र शेतकरी वापरासाठी उपलब्ध झालेले नाही. बिगर हंगामी पाऊस, उशिरापर्यंत असणारी थंडी, तापमानामध्ये अचानक होणारी वाढ, गारपीट यांसारख्या व्याधी आंबा उत्पादनास घातक ठरतात.
नैसर्गिक आपत्तींपासून उत्पादन वाचवायचे असल्यास झाडांना सशक्त बनवणे आवश्यक आहे. त्यासाठी झाडांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे. भविष्यात हवामानातील बदलास प्रतिकार करणारा तसेच उत्तम रंग, स्वाद, टिकाऊपणा आणि भरपूर उत्पादन देणारे वाण विकसित करणे हे आव्हान आहे. आजमितीस आंब्याचे 25 ते 30 टक्के उत्पादन फुकट जाते किंवा कवडीमोल भावाने विकले जाते. विद्यापीठाने कच्च्या आंब्यापासून चटणी, लोणची तसेच वाईन आणि पिकलेल्या आंब्यापासून विविध पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. समूह/सहकारी तत्त्वावर अत्याधुनिक प्रक्रिया केंद्रे उभारणे व त्याद्वारे दर्जेदार पदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करून हापूस नोव्हेंबरमध्ये किंवा आधीही बाजारात येतो. मात्र खरा हंगाम हा मार्च ते मे असा तीन महिने आहे. मुंबईत विकला जाणारा आंबा प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समिती च्या माध्यमातून येतो. एपीएमसीच्या वाशी येथील फळ मार्केटमध्ये राज्यातील देवगड, रत्नागिरी, वेंगुर्ला, श्रीवर्धन, अलिबाग, जुन्नर येथून तसेच कर्नाटक आणि गुजरात (बलसाड) राज्यांतूनही आंबा येतो. हापूससोबतच पायरी, केशर, बदामी, लंगडा, दशेहरी, लालबाग हापूस आदी आंब्याचे विविध प्रकार एपीएमसी मार्केटमध्ये दरवर्षी जानेवारी ते जून या कालावधीत दाखल होतात. आंब्याचा सीझन सुरू होतो तो देवगड हापूसच्या आगमनाने. कापूस आणि पायरी हे आंबे डझनच्या भावाने विकले जातात तर अन्य आंबे मात्र किलोवर विकले जातात.

No comments:

Post a Comment