काही प्रदेशांची काही वैशिष्टयं असतात. ती पोषाखाशी, तिथल्या पिकांशी संबंधित असतात. त्याचे परिणाम तिथल्या बोलीवर होत असतात.तिथल्या भाषेवरही होत असतात. घाटमाथ्यावरून खाली समुद्राकडं उतरत चाललो की भुताखेतांच्या गोष्टी लेणं मराठीचं कानावर पडू लागतात. या भुतांचेही अनेक प्रकार. मुंजा, खवीस, समंध, हडळ हे त्यातलेच काही. आता प्रत्यक्षात जरी हे नसले तरी लोकमनात घर करून असतातच. एकदा का हे पाठी लागले की त्यांना शांत करावं लागतंच. जे हाती असेल, उपलब्ध असेल ते द्यावं लागतं. मग हे त्रस्त समंध शांत होतात असा समज. या प्रदेशात भाताचं पीक मुबलक. मग त्यांना भात ठेवला की ते शांत होतात हा समज रूढ झाला.
त्यावरून मग लोक म्हणू लागले, असतील शितं तर जमतील भुतं ! या वाक्प्रचाराला मग आणखी एक अर्थ चिकटला. लाभाचा, फायद्याचा. म्हणजे लाभाची गोष्ट असली की फायदा घेण्यासाठी लोक एकत्र येणारच हा. मग त्यांची मतं, तत्त्वं आणि विचारधारा कितीही टोकाची. भिन्न असू दे.आपली मतं,विचारधारा खुंटीला टांगून ठेवून लोक एकत्र येतातच,याची प्रचिती आपल्यालाही व्यवहारात येते. तशी ती आली की आपण म्हणतो, 'असतील शितं तर जमतील भुतं' ! - सदानंद कदम
No comments:
Post a Comment