नुकत्याच संपलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत जेम्स अँडरसनने 600 बळींचा टप्पा गाठत नवा विक्रम नोंदवला. कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळी मिळवणारा तो पहिलाच जलदगती गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ग्लेन मॅग्रा 563 बळींपर्यंत पोहोचला. त्याआधी वेस्ट इंडिजच्या कर्टनी वॉल्शने 500 बळींचा टप्पा ओलांडला होता. अँडरसनचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉडच्या नावे 514 बळी आहेत. त्याखालोखाल दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनने 439 बळी मिळवले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरनने सर्वाधिक 800 बळी मिळवले . दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर अनुक्रमे शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे आहेत. म्हणजेच सर्वाधिक बळी मिळवणारे पहिले तीन फिरकी गोलंदाज आहेत. मात्र जलदगती गोलंदाजांमध्ये 600 बळींचा टप्पा गाठणारा अँडरसन पहिला गोलंदाज आहे.
क्रिकेटपटू होणं हे स्वप्न असलेल्या अँडरसन मे 2003 मध्ये झिंबाव्वेविरुद्ध पहिली कसोटी खेळला. 156 कसोटी सामने खेळणार्या अँडरसनने 33,745 चेंडू टाकले आहेत. आजवर कोणत्याही जलदगती गोलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये एवढे चेंडू टाकलेले नाहीत. कर्टनी वॉल्श 30,019 चेंडूंसह दुसर्या स्थानी आहे. 30 जुलै 1982 रोजी जन्मलेल्या अँडरसनने वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे 2002 मध्ये एकदिवसाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अवघ्या काही महिन्यात तो कसोटी खेळू लागला. पदार्पणानंतर काही काळातच अँडरसन इंग्लंडमध्ये बराच लोकप्रिय झाला. एकदिवसाच्या क्रिकेटपणे पदार्पण करण्याआधी अँडरसन फक्त पाच प्रथम श्रेणी सामने खेळला होता. त्याने काउंंटी खेळायलाही सुरूवात केली नव्हती. इंग्लंडच्या एकदिवसीय संघातलाही तो प्रमुख खेळाडू होता. मात्र 2015 च्या विश्वचषकानंतर तो 50 षटकांचे सामने खेळलेला नाही. अँडरसन इंग्लंडचं कसोटी क्रिकेटमधलं अस्त्र बनला.
अँडरसनची सुरूवात झोकात झाली नव्हती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं त्याचं पदार्पण म्हणावं तितकं गाजलं नव्हतं. इंग्लंडच्या संघात स्वत:चं स्थान पक्कं करण्यासाठी तब्बल पाच वर्षं लागली. उमेदीच्या काळात अँडरसन खूप वेगात गोलंदाजी करायचा. बरेचदा त्याच्या चेंडूची गती 140 किलोमीटर प्रति तास या पेक्षाही अधिक असायची. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त वेगाच्या बळावर बळी मिळवता येत नाहीत. वेगासोबतच चेंडूची दिशा आणि टप्प्याला खूप महत्त्व आहे. कालांतराने अँडरसनचा वेग कमी झाला. मग त्याने अधिकाधिक बळी मिळवण्यावर लक्ष केंद्रित केलं. फलंदाजांना गोंधळात टाकणार्या आणि अडचणीत आणणार्या चेंडूवर त्याने प्रभुत्व मिळवलं. या सगळ्याचं फळ अँडरसनला बळींच्या रुपात मिळत गेलं. तो यशाची एक, एक पायरी चढत गेला. बळींचं शतक, द्विशतक, त्रिशतक गाठत तो आता 600 बळींपर्यंत पोहोचला आहे. सचिन तेंडुलकरसारख्या जगातल्या सर्वोत्तम फलंदाजाला अँडरसनने कसोटीत नऊ वेळा बाद केलं असून अशी कामगिरी करणारा तो एकमेव गोलंदाज आहे. म्हणूनच ग्लेन मॅग्राने त्याला गोलंदाजीतला सचिन तेंडुलकर म्हटलं असावं!
No comments:
Post a Comment