भारतातील सर्वात मोठे हरीण म्हणून सांबराचा क्रमांक लागतो. दिमाखदार शिंगांचा पसारा मिरवत रानातून ऐटीत चालणारा नर सांबर बघणे म्हणजे नेत्रसुख असते.जगात सांबरांचा आढळ भारतीय उपखंड, दक्षिण चीन व आग्नेय आशियातील देशांत आहे. साधारण भेकराचा व याचा आढळ एकाच प्रदेशात आहे. जगात सांबराच्या एकूण सात उपप्रजाती अस्तित्वात आहेत. भारतातील उपप्रजाती सर्वात मोठी असून त्यांचा आढळ पश्चिमेकडील वाळवंटी प्रदेश व हिमालयातील अतिउंच भाग सोडले तर देशात सर्वत्र आहे. रुसा युनिकलर असे शास्त्रीय नाव असलेल्या सांबाराला अन्य भाषांत सांबर (हिंदी),कुडू मार्न (तमिळ), कुलाय मार्न (मल्याळम), कुडावे (कन्नड), सुत (बर्मिज) अशी नावे आहेत. महाराष्ट्रात सांबरांचा आढळ मुख्यत्वे सह्याद्रीच्या रांगा, कोकण, सातपुडा व विदर्भाच्या बहुतांश भागात आहे. सांबराचे वास्तव्य उष्णकटिबंधीय सदाहरित व पानगळी तसेच उप-उष्णकटिबंधीय जंगलात असते. विशेषतः डोंगर,दऱ्या व टेकड्या असलेल्या भागात त्याचे वास्तव्य असते.
भारतीय नर सांबाराची खांद्यापाशी उंची 5 फुटापर्यंत व वजन 225 ते 320 किलोपर्यंत असते. शिंगांची लांबी 36 ते 38 इंच इतकी असते. सांबाराची शिंगे मजबूत असतात. सांबर चार वर्षांचे होईपर्यंत पूर्ण लांबीची शिंगे येतात. दरवर्षी आधीची शिंगे गळून नवीन शिंगे येतात. एखाद्या दरीतील रानावर हक्क प्रस्थापित करण्यासाठी दोन नर सांबरांमध्ये लढाई होऊ शकते. विणीचा काळ वगळता नर सांबर एकटेच राहतात. माद्या व पिल्लेसुद्धा साधारणतः5-6 पेक्षा जास्त संख्येने एकत्र दिसत नाहीत. सांबर अतिशय मजबूत असते. प्रतिकूल परिस्थितीतही तग धरू शकते. त्वचेवरील केस खरखरीत ,लांब, दाट व थोडे विस्कटलेले दिसतात. उष्ण हवामान असल्यास केस कमी दाट असतात. प्रौढ नरांमध्ये मानेभोवतीचे केस अधिक लांब असतात. व लहानशा आयाळीसारखे भासतात. पोटाकडचा भाग थोडा फिका असतो. नरांचा रंग वयानुसार गडद व काळपट तपकिरी होत जातो.
सांबराचे अन्न म्हणजे गवत,पाने व विविध प्रकारची फळे. संध्याकाळपासून पहाटेपर्यंत मुख्यतः रात्रीच्या वेळी सांबर चरतात. जंगलातील वनस्पतींच्या वाढीवर पुरेसे नियंत्रण ठेवण्याचे व विष्टेतून बीजप्रसार करण्याचे काम सांबर करतात. वाघ,सिंह, बिबट्या, रानकुत्रा व मगर यांसारख्या प्राण्यांचे ते भक्ष्य आहे. दाट जंगलात राहत असल्याने सांबाराला शत्रूपासून बचाव करण्यासाठी तीव्र श्रवणेंद्रिये व घ्राणेंद्रियांचा उत्तम उपयोग होतो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment