Tuesday, 8 September 2020

लिओ टॉलस्टॉय


सुप्रसिद्ध रशियन लेखक, तत्त्वज्ञ, प्रचारक आणि सुधारक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म ९ सप्टेंबर १८२८ रोजी तूला प्रांतातील यास्नया पल्याना या जहागिरीच्या ठिकाणी एका श्रीमंत सरदार घराण्यात झाला. कझ्ॉन विद्यापीठात १८४४ ते १८४७ पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी कॉकेशसमध्ये सैन्यात नोकरी केली. क्रिमियन युद्धात सिव्हॅस्तपोलच्या लढाईत त्यांनी भाग घेतला. त्यानंतर मुख्यत: मॉस्को व पीटर्झबर्ग येथील आपल्या घराण्याच्या जहागिरीच्या ठिकाणीच राहिले. १८६२ मध्ये त्यांचा सोन्या (सोफ्या)या मध्यमवर्गीय मुलीशी विवाह झाला होता. विवाहोत्तर पहिली १५ वर्षे सुखाची गेली. या काळात त्यांना १३ अपत्येही झाली. तथापि त्याने स्वीकारलेल्या विशिष्ट धार्मिक-नैतिक जीवननिष्ठेमुळे त्याच्या कौटुंबिक जीवनात ताण निर्माण झाले. १८५२ मध्ये प्रकाशित झालेली टॉलस्टॉयची पहिली लेखनकृती द्येत्स्त्व ही त्याच्या आत्मचरित्रात्मक ग्रंथत्रयीचा पहिला भाग होती; या कृतीतून तरुण टॉलस्टॉयच्या बुद्धीची व विचारांची प्रगल्भता लगेच नजरेस येते.

आत्मचरित्राचे दुसरे दोन भाग, ओत्रोचिस्त्व आणि यूनत्स, अनुक्रमे १८५४ व १८५६ मध्ये प्रसिद्ध झाले. या त्रयीत, त्याचप्रमाणे उत्रो पमेश्शिका आदी आपल्या आधीच्या लेखनकृतींतून टॉलस्टॉयने सामान्य माणसाचे जीवन आणि सरदार-जमीनदार आदींशी त्याचा संघर्ष यांचे चित्रण करण्यावरच आपले लक्ष केंद्रित केले आहे. क्रिमियन युद्धात प्रत्यक्ष भाग घेतल्यामुळे आपल्या सिवास्तोदील्स्कीये रस्काझी (सिव्हॅस्तपोल स्टोरीज)मध्ये सदर युद्धाचे यथार्थ चित्र रेखाटण्यास त्यास मदत झाली. युद्धासंबंधीचा लेखी पुरावा या दृष्टीने या कथांचे महत्त्व आहेच; पण त्याशिवाय या कथांतून सदर युद्धातील वीरांच्या मनोव्यापारांचे ठळक विेषणही केलेले दिसते. हाच प्रकार १८६३ साली तरुण टॉलस्टॉयने लिहिलेल्या कझाकी (कोसॅक्स) या महत्त्वाच्या कादंबरिकेबाबतही प्रत्ययास येतो. शिक्षण आणि शिक्षणशास्त्र यांवर तरुण टॉलस्टॉयची निश्‍चित मते होती. आपले विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी यास्नया पल्याना येथे १८४९ मध्ये त्याने शेतकर्‍यांच्या मुलांसाठी एक शाळा सुरू केली आणि यास्नया पल्याना याच नावाच्या नियतकालिकात त्यांनी १८६२-६३ या काळात अनेक लेख लिहिले. १८६३ ते १८६९ या काळात टॉलस्टॉयने आपली राष्ट्रीय महत्त्वाची प्रदीर्घ कादंबरी वॉर अँड पीस ही लिहिली. टॉलस्टॉयचा असा विश्‍वास होता, की असल्या गोष्टींत व्यक्तींना काही महत्त्व नसते; त्या अगदी नेपोलियन आणि कुतूझपसारख्या सेनानींइतक्या महत्त्वाच्या व शक्तिमान असल्या तरीही. इतिहासाकडून टॉलस्टॉय अँना करेनिना (१८७५-७७) या आपल्या पुढील कादंबरीत समकालीन समाजाकडे वळलेला दिसतो. या कादंबरीत सरदार घराण्यात जन्मलेल्या. परंतु, महत्त्वाकांक्षा आणि वैयक्तिक अहंभावाने पछाडलेल्या उच्चभ्रू समाजाच्या ढोंगी नीतिमत्तेविरुद्ध लढा देणार्‍या एक रशियन स्त्रीची करुण कहाणी आहे. सामाजिक अंतर्विरोधांवर अचूक बोट ठेवून टॉलस्टॉयने हे दाखवून दिले आहे, की अँनासारख्या संवेदनशील, उत्साही व चैतन्यशील जीवाचा तत्कालीन रशियन समाजातील परिस्थिती व भेदक वास्तवता कसा कोंडमारा करून टाकते. तिचे आत्यंतिक दु:ख आणि करुण शेवट यांमागचे प्रमुख कारण हेच होते.

No comments:

Post a Comment