Saturday, 19 September 2020

कर्मवीर भाऊराव पाटील


समाज सुधारक आणि शिक्षणप्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी झाला.   यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. त्यांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' ही योजना सुरू करून मोठे काम केले. जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे ते महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढय़ातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्हय़ातील कुंभोज या गावी जैन कुटुंबात झाला. सांगली जिल्हय़ातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांचे पूर्वज कोल्हापूरजवळील जैन नादणी मठाचे भट्टारक पट्टाचार्य. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांसोबत खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगलीतील विटा आणि इतरही काही गावात झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. पुढील काळात सातार्‍यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदी मंडळींबरोबर दुधगावात 'दुधगाव शिक्षण मंडळ' स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किलरेस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला. ४ ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्हय़ातील काले येथे केली. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यानी 'रयत'ला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. सातार्‍यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वत:चे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे 'श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस' असे नामाभिधान करण्यात आले. महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी १९५९मध्ये डी. लिट. ही पदवी दिली होती. ह.रा. महाजनी यांनी 'महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन' या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. ९ मे १९५९ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

No comments:

Post a Comment