Wednesday, 9 September 2020

भारताची सारक्षरता 77.7 टक्के


नुकताच जागतिक साक्षरता दिन साजरा करतात आला.  व्यक्तीबरोबरच, समाजामध्येही साक्षरतेचे महत्त्व रुजवण्यासाठी युनोस्कोकडून दरवर्षी 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्यात येतो. युनोस्कोच्या 14 व्या अधिवेशनात26 ऑक्टोबर1966 रोजी या दिनाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर 8 सप्टेंबर 1967 ला पहिला आंतरराष्ट्रीय दिन साजरा झाला.आपल्या देशाची साक्षरता 77.7 टक्के इतकी आहे. मात्र ही साक्षरता शहरी भागात जास्त म्हणजे 87.7 टक्के तर ग्रामीण भागात73.5 टक्के इतकी आहे. साक्षरतेमध्ये केरळने देशातील सर्वाधिक साक्षर राज्याचा लौकिक कायम ठेवला आहे. राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षणाच्या अहवालातून ही आकडेवारी जाहीर झाली. जुलै 2017 ते जून 2018 या कालावधीत केरळ  96.2 टक्के साक्षर असल्याचं अहवाल सांगतो. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली असून येथील साक्षरता 88.7 टक्के इतकी आहे. उत्तराखंड राज्यातील साक्षरता 87.6, हिमाचल प्रदेश 86.6, आणि आसाम 85.9 टक्के इतकी आहे. सगळ्यात कमी साक्षरता असलेल्या राज्यांमध्ये आंध्रप्रदेश (66.4 टक्के), राजस्थान (69.7), बिहार (70.9), तेलंगणा (72.8), उत्तर प्रदेश(73) आणि मध्य प्रदेश (73.7) या राज्यांचा समावेश आहे.  यामध्ये महाराष्ट्राची साक्षरता 82.9 टक्के इतकी आहे. या कालावधीत संगणक असलेल्या घरांच्याही नोंदी घेण्यात आल्या होत्या. यात फक्त 27 टक्के घरांमध्ये संगणक असल्याचे आढळून आले आहे. यातही 23 टक्के शहरी भागात तर 4 टक्के ग्रामीण भागात संगणक असल्याचे अहवालावरून दिसून येते. संगणक साक्षर होण्यासाठी आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पण आता फक्त साक्षर होऊन चालणार नाही तर संगणक, स्मार्टफोन साक्षरही होणं गरजेचं झालं आहे. सध्याच्या घडीला आपल्या देशात जवळपास 50 कोटी स्मार्टफोनधारक आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लादलेल्या टाळेबंदीने शाळा-कॉलेज बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र सगळीच मुले-मुली काही या मार्गाने शिक्षण घेत नसले तरी संगणक आणि स्मार्टफोन यांची गरज लक्षात आली आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment