Saturday, 5 September 2020

विलोभनीय लेह-लडाख


हिमालयाच्या कुशीतील एक विलोभनीय आणि साहसी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे लेह-लडाख. रुपेरी पडद्यावरील अनेक दृश्यांमधून अथवा वृत्तपत्रांमधून आपण लडाखचे अप्रतिम निसर्गसौंदर्य पाहिलं आहे.आता लडाख हा स्वतंत्र केंद्रशासीत प्रदेश झाला आहे. हा प्रदेश भारतातील सर्वात उंचावर असलेले लडाख पठार म्हणून ओळखला जातो. पांढर्‍या शुभ्र हिमाच्छादित शिखरांमुळे आणि प्रचंड उंचीमुळे येथील वातावरण स्वर्गाप्रमाणे असते. निळंशार पाणी, कोवळ्या सोनेरी किरणांनी प्रफुल्लित झालेली हिरवाई, समोर विशालकाय पर्वतराजी आणि जोडीला गारठवणारी थंडी, असं इथलं निसर्गसौंदर्य न्याहाळताना थक्क व्हायला होतं. इथलं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे बर्फाची स्वच्छ चादर पांघरलेली हिमशिखरे दिसतानाच, दुसरीकडे वाळवंटही पाहायला मिळतो. हवामानही असेच विषम असते. कधी कमालीचा उकाडा, तर कधी रक्त गोठवणारी थंडी असते. समुद्रसपाटीपासून सर्वात उंच असलेला हा प्रदेश. हा प्रदेश सिंधू नदीचं उगमस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे.नोव्हेंबर ते मार्चपर्यंत  इथलं तापमान उणे ५ ते उणे २५-३0 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते.  इथे पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. शहराच्या मध्यभागी असेला लेह पॅलेस सोळाव्या शतकात बांधण्यात आला असून, त्यामध्ये बौद्ध जीवनदर्शन घडवणारी अप्रतिम चित्रे पाहायला मिळतात. येथील नामग्याल तेस्मो या मठामध्ये भगवान गौतम बुद्धांची एक मूर्ती असून, भिंतीवरची चित्रे, जुने दस्तावेज आणि इतर ऐतिहासिक आणि धार्मिक वस्तू दृष्टीस पडतात. गोंपा तेस्मो हा एक शाही मठ असून, तो लेह महालापासून थोड्याच अंतरावर आहे. या मठामध्ये भगवान बुद्धांची बैठय़ा स्वरूपातील सुमारे तीन मजली उंचीची भव्य मूर्ती आहे. १६६५ मध्ये ही मूर्ती नेपाळी शिल्पकाराने घडवली आहे. हिमस गोंपा हे लडाखचे प्रसिद्ध बौद्ध सांस्कृतिक केंद्र आहे. इथं अनेक कलात्मक वस्तूंचा संग्रह केलेला दिसून येतो. लेहपासून १६0 किलोमीटर अंतरावर पॅगॉग लेक हा १४ हजार फूट उंचीवरचा भारतातील सर्वात मोठा खार्‍या पाण्याचा तलाव आहे.

लेह-लडाखच्या भटकंतीमध्ये  आकर्षण असते ते मॅग्नेटिक हिल अर्थात चुंबकीय टेकडीचे. या टेकडीला पूर्वी ग्रॅव्हिटी हिल म्हणूनही संबोधले जात होते. या टेकडीवर गाड्या ओढल्या जातात, असे सांगितले जाते.त्यामुळेच ही चुंबकीय टेकडी निसर्गाचा एक चमत्कार मानली जाते. लेह-कारगिल-बटालिक राष्ट्रीय महामार्गावर ही टेकडी आहे. या टेकडीच्या पूर्वेला सिंधू नदी वाहते. येथील रस्त्यावर एके ठिकाणी माकिर्ंग केलेले आहे. पर्यटक या ठिकाणी राहून या अद्भुत आणि गूढ अनुभवाची प्रचिती घेतात. 

No comments:

Post a Comment