विष्णू सखाराम खांडेकर यांचा जन्म 19जानेवारी १८८९ सांगली येथे झाला.पुढील शिक्षण सांगली व पुणे येथे झाले. 1920 मध्ये शिरोड्याच्या टिटोरियल इंग्लिश स्कूल मध्ये प्रथम शिक्षक व नंतर मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केले .1938 मध्ये या शाळेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कोल्हापूर मध्ये वास्तव्य केले. कोल्हापुरात राहिल्यानंतर त्यांनी भरभरून लेखन केले .1919 पासून त्यांचे लेखन प्रकाशित होऊ लागले. घर कोणाचे ही त्यांची पहिली लघुकथा महाराष्ट्र साहित्य या मासिकात प्रसिद्ध झाली. त्यांचा हृदयाची हाक ही त्यांची पहिली कादंबरी. 'वायुलहरी' हा त्यांचा पहिला लघुनिबंध. खांडेकरांचे लेखन बहुविध स्वरूपाचे होते. पंधरा कादंबऱ्या , एक लघुकथा संग्रह ,निबंध ,रूपककथा, एक नाटक याशिवाय काही चरित्रात्मक, समीक्षात्मक ग्रंथ व संकीर्ण लेखसंग्रह यांचा समावेश होता .तसेच त्यांनी मराठी हिंदी व तेलगू चित्रपटांसाठी एकूण अठरा पटकथा लिहिल्या. त्यांच्या बहुतेक साहित्यकृतींच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. अनेक कादंबऱ्यांचे भारतातील अन्य भाषा विशेषतः गुजराती, तमिळ, हिंदी या भाषांत अनुवाद झालेले आहेत .अनेक पुस्तकांची त्यांनी संपादन करून काही पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत.
जीवन व कला यांना वाहिलेल्या मासिकाचे ते संपादक होते. 1961 मध्ये त्यांच्या "ययाती "या कादंबरीला महाराष्ट्र सरकारने कादंबरी विभागाचे पहिले पारितोषिक व एक लाख रूपये दिले. या कादंबरीला याच वर्षी साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. 1941 मध्ये सोलापूर येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले . मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांना मिळाले. 1968 मध्ये भारत सरकारने त्यांना "पद्मभूषण" हा किताब दिला.
आगरकर, केशवसुत, हरिभाऊ ,श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी इत्यादींच्या साहित्याचे त्यांच्यावर ऊत्कट संस्कार झाले. आणि त्यामुळे मुळातच समाज प्रवण असलेले त्यांचे मन अधिक समाजसन्मुख झाले. कादंबरीला तंत्रदृष्ट्या प्रगल्भ व प्रभावी करण्याचे श्रेय ना. सी .फडके यांच्या बरोबर खांडेकर यांनाही दिले पाहिजे .मराठी भाषेला त्यांनी वेगवेगळ्या प्रयोगांनी समृद्ध व संपन्न केले. कुसुमाग्रज , बा.भ. बोरकर, बाबा आमटे यांच्या काव्य गुणाचा प्रभावी परिचय त्यांनी पहिल्यांदाच आपल्या प्रस्तावनेतून महाराष्ट्राला करून दिला .
मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी अखंडपणे कार्यरत असलेले एक श्रेष्ठ समर्पित साहित्यिक म्हणून खांडेकरांचे नाव मराठी साहित्यात अजरामर झाले. वि.स.खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले पहिले मराठी साहित्यिक होते. खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून ओळखले गेले. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला.
कुमारवयापासूनच त्यांच्यावर उत्तम साहित्याचे संस्कार होत होते, ते त्यांच्या मराठीच्या शिक्षकांमुळे आणि बालकवी, राम गणेश गडकरी, अच्युतराव कोल्हटकर यांसारख्या साहित्यिकांशी झालेल्या परिचयामुळे. गडकरींमुळे पाश्र्चात्त्य साहित्य वाचण्याचा छंदही त्यांना तेव्हा लागला होता. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी खांडेकरांना विनोद चांगला साधतो व काव्यात्म प्रकृतीचे लेखनही ते करू शकतात, तेव्हा या दोहोंचे मिश्रण असलेल्या गोष्टी त्यांनी लिहाव्यात असे सुचवले; तेव्हा खांडेकर यांना स्वत:त लपून बसलेला कथाकार सापडला. ते उत्कृष्ट वक्ते म्हणूनही महाराष्ट्रात प्रसिद्ध होते.
एक कादंबरीकार म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच त्यांना महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही अफाट लोकप्रियता मिळाली. १९३० मध्ये ‘हृदयाची हाक’ ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. त्यानंतर एकापाठोपाठ एक 'कांचनमृग' (१९३१), 'दोन ध्रुव' (१९३४), 'हिरवा चाफा', 'दोन मने' (१९३८), 'रिकामा देव्हारा' (१९३९), 'पहिले प्रेम' (१९४०) अशा त्यांच्या अनेक कादंबर्या प्रकाशित झाल्या. सुमारे ३५ कथासंग्रह, १० लघुनिबंध संग्रह, 'गोफ आणि गोफण' यांसारखे समीक्षालेख संग्रह असे झंझावाती लेखन त्यांनी केले. 'छाया', 'ज्वाला', 'अमृत', 'देवता', 'माझं बाळ' यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या.
शब्दप्रभुत्व, कोटीबाजपणा, कल्पनावैभव यांचा वारसा त्यांनी कोल्हटकर-गडकरी यांच्याकडून घेतला. मध्यमवर्गीय माणसांच्या आशा-आकांक्षा, सर्वसामान्यांची सुख दु:खे, त्यांचा आदर्शवाद त्यांनी मुख्यत्वे आपल्या कथा-कादंबर्यांतून मांडला. त्यांचा नायक हा सामाजिकतेचे भान असलेला, आदर्शाची ओढ असलेला असे. हळूहळू बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितीत या प्रकारचा आदर्शवाद ही मध्यमवर्गीय तरुण पिढीची मानसिक गरज होती. त्यामुळे खांडेकर त्या काळातले सर्वांत लोकप्रिय लेखक ठरले. त्यांची 'क्रौंचवध' (१९४२) ही कादंबरीही लोकप्रिय ठरली. ययाती(१९५९), 'अमृतवेल' (१९६७) या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत जास्त गाजलेल्या त्यांच्या कादंबर्या होत. ‘ययाती’ला १९६० चा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला.
भारत सरकारने १९६८ मध्ये पद्मभूषण सन्मान देऊन त्यांना गौरवले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहला केली. तर भारतीय ज्ञानपीठातर्फे १९७४ मध्ये त्यांना ‘ज्ञानपीठ’ या अत्युच्च मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या कथा-कादंबर्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दुरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय भाषांत व विदेशी भाषांतही अनुवाद झाले.
‘रूपककथा’ ही खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली देणगी होय. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी त्यांनी या कथांतून केली. 'वेचलेली फुले' (१९४८) या संग्रहात या रूपककथा आहेत. अक्षरश: चकित व्हायला व्हावे एवढे विविध प्रकारचे, विपुल आणि तरीही दर्जेदार असे लेखन करून खांडेकरांनी मातृभाषेची सेवा केली आहे, आणि त्यायोगे मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून त्यांनी मराठी रसिकांत व साहित्यिकांमध्ये चैतन्य आणि आत्मविश्र्वास निर्माण केला. वि.स.खांडेकर यांचे २ सप्टेंबर १९७६ ला निधन झाले.
No comments:
Post a Comment