Tuesday, 1 September 2020

रुबाबदार वाघ


वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वाधिक वाघांची संख्याही भारतातच आहे. दुर्गादेवीचे वाहन म्हणून सन्मान मिळालेला हा रुबाबदार वाघ आपल्या देशात वाघ, व्याघ्र, टायगर, बाघ, पूली, कडुवा व हुली आदी नावांनी विविध भाषांमध्ये ओळखला जातो. जगात वाघाच्या (पँथेरा टायग्रीस) सहा उपजाती अस्तित्वात आहेत. भारतीय (बंगाल), सायबेरियन, इंडो-चायनीज, मलायन, दक्षिण चिनी व सुमात्रन या जाती सध्या अस्तित्वात आहेत तर कॅस्पियन, जावन व बालिनीज जाती नष्ट झाल्या आहेत. भारतात उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, ओरिसा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक ,गोवा आणि केरळ राज्यांमध्ये वाघ आहेत. महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांपैकी 17 जिल्ह्यांत वाघांचा अधिवास आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा, जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली ,सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत वाघ आढळतो.

एस.एच.प्रॅटरच्या पुस्तकानुसार भारतातल्या नर वाघाचे वजन 180-240 किलो,तर मादीचे 100-150 किलो असते. नराची लांबी 9 ते 10 फूट तर मादीची लांबी  8 ते 9 फूट असते. पिवळसर केशरी रंगावर काळे पट्टे असतात. त्याचे आयुष्यमान सरासरी15 वर्षे असते. सांबर,चितळ, भेकर, बारशिंगा, वराहमृग, गवा व रानडुक्कर आदी प्राणी वाघाचे खाद्य आहेत. वाघ पानझडी, नीम-सदाहरित, खारफुटी, खुरटी आणि समशीतोष्ण अशी वने व गवताळ प्रदेशाच्या मिश्र पट्ट्यात राहतो. वाघ हा अथर्ववेद, यजुर्वेद, आयुर्वेद, पुराणे व हितोपदेश गोष्टींमध्ये भेटतो. तो काही ठिकाणी देवतांच्या स्वरूपातही पुजला जातो. चलनी नोटांवरील रिझर्व्ह बँकेच्या चिन्हावर असलेला वाघही अर्थव्यवस्थेतील पर्यावरणाच्या महत्त्वाची जाणीव करून देत असतो. रुडयार्ड किप्लिंगने अजरामर केलेला शेरखान सर्वपरिचित आहे. महाभारतात वाघाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे- 'वाघांचे वास्तव्य असलेली वने तोडू नयेत व वनांतील वाघांना संपवू नये. वाघांच्या अस्तित्वामुळे वनांचे रक्षण होते. तसेच वनांमुळे वाघांचे रक्षण होते.'-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment