Sunday, 6 September 2020

सातारा: जैवविविधतेनं नटलेला परिसर


साताऱ्याला ऐतिहासिक वारसा असला तरी खऱ्या अर्थाने सातारा जगाच्या दृष्टीने प्रकाशमय झालं कोयना प्रकल्प आणि कास पठारानं. कासचं पठार जैवविविधतेनं नटलेलं समृद्ध ठिकाण. उत्तराखंडातील जगप्रसिद्ध 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स'प्रमाणे कास पुष्पपठाराची कीर्ती सर्वत्र दरवळत आहे. साताऱ्यापासून अवघ्या 25 कि.मी. अंतरावर असणाऱ्या या पठारावर ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत निरनिराळ्या पुष्पांची लयलूट सुरू असते. काही वर्षापूर्वी तर कशाला कुसळं बघायला निघालाय का, अशी हेटाळणी होत होती, पण आता इथलं चित्र बदललं आहे. साताऱ्यातील दुसरे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे Power House of Maharashtra म्हणजे कोयनानगर, तेथील धरणाचे स्थान अन् विशाल शिवाजी सागराचा जलाशय बघितला, तर डोळे दिपून जातात. माणूस नतमस्तक होतो. पूर्वी प्रकल्पाचा टप्पा, येथील तंत्रप्रणाली, Operative System पाहण्याची परवानगी मिळत असे, परंतु दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता हा भाग अतिसंवेदनशील म्हणून गणला गेला आहे. तेथील भव्य नेहरू स्मारक उद्यान, तेथील हिरवळ डोळ्यात साठवत मनुष्य निसर्गाच्या प्रचंड वेगापुढे नतमस्तक होतो. तेथे आता या प्रकल्पाची Documentary दाखवली जाते अन् हा प्रकल्प महाराष्ट्रास कसा प्रगतीपथावर नेत आहे. हे दाखवले जाते. 13 मार्च 1999 रोजी प्रथम लेक टॅपिंगचा यशस्वी प्रयत्न कण्यात आला. त्यामुळे जलाशयाच्या खालून 4 किमी.दा बोगदा तयार करून पाण्याचा प्रवाह नेऊन वीजनिर्मिती करण्यात आली. त्यानंतर 2012 मध्येही लेक टॅपिंगचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. याबरोबरच चाळकेवाडी येथे पवनऊर्जा केंद्र उभारण्यात आले. तिथे आत जाऊन पवनचकीतील सर्व ऊर्जा पद्धतीबद्दल माहिती घेऊ शकतो. ठोसेघर हे सजनगड-चाळकेवाडी मार्गावरील धबधब्याचे एक रम्य ठिकाण.  येथील अपघातांची संख्या लक्षात घेता येथे चारही बाजूंनी संरक्षक कठडा उभारण्यात आला आहे. तंत्रज्ञानाची कास धरणारा हा जिल्हा आध्यात्मिक क्षेत्रातही मानाचा आहे. औंध येथे डोंगरावर यमाई देवीचे मंदिर आहे. तेथील राजवाडा, वस्तुसंग्रहालय, आर्ट गॅलरी, पाली, तारळी नदीकाठी वसलेले खंडोबाचे जागृत देवस्थान, माहुली, श्रीमंत शाहू महाराजांची समाधी व इतर राजघराण्यातील समाधी, यवतेश्वर, मंगळागौरी, राधाशंकर, बिल्वेश्वर, रामेश्वर मंदिर, सज्जनगड, यवतेश्वर, वाई, सीतामाई डोंगर, वाल्मिकी, शिखर शिंगणापूर, कुरणेश्वर या पर्यटनस्थळांची यादी संपता संपत नाही, पण सातारा हा पाचगणी अन् महाबळेश्वर या HII Stations (थंड हवेचे ठिकाण) शिवाय अपूर्ण आहे. येथील सर्व पॉईट, जॅमचे कारखाने, घोडेस्वारी, टेबल लँड, स्ट्रॉबेरीची शेती, थंडगार धुके, दवाची रजई अन् धबधब्याच्या तुषारांनी पुलकित झालेले मन सहज म्हणून जाते, 'महाराष्ट्राचा स्वर्ग कुठे आहे, तर साताऱ्यातील पाचगणी-महाबळेश्वरला आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment