भारतीय राजकारणाचे भीष्माचार्य असा ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जायचा, ते देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे 31 ऑगस्ट 2020 रोजी निधन झाले. राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यानंतर ते सक्रिय राजकारणात नव्हते. मात्र त्यांचा मार्गदर्शनपर अनुभव देशाला दिशा दाखविणारा होता. कार्यकुशलता, कार्यतत्परता, व्यूहरचनात्मकता यामुळे त्यांना 'मॅन ऑफ ऑल सिझन' असे संबोधले जायचे.
तल्लख बुद्धिमत्ता, बिनचूक बोलणे, मोजून मापून वागणे हे प्रणवदांचे अंगभूत गुण व त्याच्या जोडीला इतरांवर छाप पाडण्याची हातोटी. सांगायचे आणि काय राखून ठेवायचे, याचे तारतम्य आणि भान बाळगणार्या मुखर्जी यांनी भारतीय राजकारणात सुसंस्कृतपणा वाढविला. लोकशाहीत संस्था महत्त्वाच्या असतात. त्यांच्या सार्वभौमत्वाला बाधा येता कामा नये, असे ते कायम सांगायचे. काही महिन्यांपूर्वी एका नामवंत संपादकाला मुलाखत देताना, संपादकाचा तोल सुटताच 'आपण प्रणव मुखर्जी या व्यक्तीशी नव्हे तर देशाच्या माजी राष्ट्रपतींशी बोलता आहात याचे भान ठेवा' असे प्रणवदांनी सुनावले होते. आयुष्यभर काँग्रेसच्या विचारात वाढलेले प्रणव मुखर्जी २0१८ मध्ये नागपुरात राष्ट्रीय स्वयंसंघाच्या व्यासपीठावर आले होते. तेव्हा मोठाच गहजब झाला. संघाच्या व्यासपीठावर नेहरू, गांधींच्या नजरेतून राष्ट्रवादाची संकल्पना सडेतोडपणे मांडण्याचे धारिष्ट्य बंगालीबाबूंनी दाखविले होते. हे सांगताना त्यांनी देदिप्यमान इतिहासाचाही मागोवा घेतला. एक धर्म, एक भाषा म्हणजे राष्ट्र होऊ शकत नाही. या देशातील विविधतेचा सर्वांना सन्मान करावाच लागेल.सर्व धर्माचा आदरही राखावा लागेल, असे सर्वधर्मसमभावाचे गीत दादांनी संघाच्या व्यासपीठावरून गायिले होते. संघ आणि भाजपसोबत त्यांनी कॉंग्रेसलाही वास्तवाचा आरसा दाखविला होता. प्रणव मुखर्जींचा जन्म बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातला. स्वातंत्र्यसैनिक कामदा किंकर मुखर्जी आणि राजलक्ष्मी मुखर्जी या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. राज्यशास्त्र आणि इतिहास हे प्रणवदांचे आवडते विषय. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवीही घेतली. पोस्ट आणि टेलिग्राफ खात्यामध्ये एकेकाळी क्लर्क म्हणून काम करणारे प्रणवदा १९६३ मध्ये विद्यानगर महाविद्यालयात राज्यशास्त्राचे सहायक प्राध्यापक झाले. 'देशर दाक' या वर्तमानपत्रात ते काही काळ पत्रकारही होते. याच दरम्यान ते काँग्रेसकडे ओढले गेले. मिदनापूरच्या पोटनिवडणुकीत १९६९ मध्ये व्ही. के. कृष्णा मेनन उमेदवार होते. त्यांना विजय मिळवून देण्यात प्रणव मुखर्जी यांनी मोठी भूमिका निभावली होती. पुढे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना काँग्रेस पक्षात घेतले. जुलै १९६९ मध्ये प्रणव मुखर्जी राज्यसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. २00२ पर्यंत ते राज्यसभेत होते. १९९१ साली भारतावर आर्थिक संकट आले होते. सरकारने खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण हे धोरण अमलात आणले. तेव्हा नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष प्रणव मुखर्जी होते.२00४ ते २0१२ दरम्यान ते लोकसभेचे सदस्य होते. देशाचे अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, रक्षामंत्री, वाणिज्य आणि उद्योगमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. २00८ साली भारत सरकारने त्यांन पद्मविभूषण देऊन सन्मान केला. देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहणार्या प्रणवदांना पंतप्रधानपदाने मात्र हुलकावणी दिली. ते पंतप्रधान झाले असते तर देशाच्या राजकारणाला कलाटणी मिळाली असती.
सोनिया गांधी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यानंतर त्यांचे मार्गदर्शक आणि काँग्रेसचे संकटमोचक म्हणून प्रणवदा ओळखले जायचे. वैश्विक स्तरावर भारताचे अनेक देशांशी संबंध वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला. जगात भारताचा पाया मजबूत केला.२५ जुलै २0१२ रोजी प्रणव मुखर्जी देशाचे १३ वे राष्ट्रपती झाले. राष्ट्रपती भवनात गेल्यानंतर त्याही पदाची प्रतिष्ठा राखण्याचा आणि ती वाढवण्याचा प्रयत्न केला. ते पदावर आल्यानंतर दीड वर्षातच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार आले. कोणत्याही प्रकारची असंवैधानिक घटना घडू न देता राष्ट्रपतीपदाच्या प्रतिष्ठेस जपत मुखर्जी यांनी काम केले आहे. संविधानास सर्वोच्च स्थान देत, पक्ष, संघटना आणि विचारसरणी या पलीकडे जाऊन राष्ट्रपती पदाचा मान त्यांनी वाढविला. देशाच्या समाज आणि अर्थकारणावर पाच दशके प्रभाव ठेवणारे मुखर्जी राजकीय नेते म्हणून तर यशस्वी ठरलेच, पण त्याचबरोबर त्यांनी विचारवंत म्हणूनही वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा व्यासंग दांडगा होता. संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आणि राजकारणाचे जाणकार असणार्या ऋषितुल्य प्रणवदांचे जाणे म्हणूनच भारतीयांना पोरके करणारे ठरते. घरात जसे कुटुंबप्रमुखाचे स्थान असते, तसेच भारत नावाच्या राष्ट्रीय कुटुंबात प्रणवदांची जागा होती. राजकारणात डोके ठेवावे असे पाय हल्ली कमीच राहिले, जी थोडीफार हिमालयासारखी माणसे आहेत, त्यापैकी प्रणवदा एक. तो देव्हारा आता रिता झाला आहे.
No comments:
Post a Comment